मुरबाड | प्रतिनिधी
मुरबाड तालुक्यातील खांडपे परिसरातील वनखात्याच्या राखीव जंगलातून फार्महाऊससाठी सुमारे दोन किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. वन्यप्राणी व पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घनदाट जंगलातून सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाच्या जागेतून रस्ता केल्याचा आरोप होत असून, यासाठी सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले जात आहे.
खांडपे परिसरातील या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदेचे नुकसान झाले असून, हरिण, निलगाय, रानडुक्कर, मोर, माकडे यांसारख्या वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होऊनही वनविभागाला याची पूर्वकल्पना नव्हती, असा दावा दक्ष नागरिक व पत्रकारांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात विचारणा केली असता संबंधित विभागांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचेही समोर आले आहे.
मुरबाड तालुक्यातील अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये आजही सुरक्षित रस्त्यांचा अभाव असून, आजारपणाच्या प्रसंगी रुग्ण व गर्भवती महिलांना डोलीतून न्यावे लागते. अशा परिस्थितीत जंगलातून खासगी फार्महाऊससाठी रस्ता कसा मंजूर झाला, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. याशिवाय, अनेक गावांतील पाणीपुरवठा योजना वनविभागाच्या परवानगीअभावी रखडलेल्या असतानाच हा रस्ता कसा तयार झाला, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.
सदर रस्त्याचे काम एम.डी.आर. ९९ मध्ये समाविष्ट असल्याचे सांगितले जात असून, काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. त्या वेळी वनविभागाने कारवाई करून काम थांबवणे गरजेचे होते का, असा प्रश्न निसर्गप्रेमी व प्राणीमित्रांकडून उपस्थित केला जात आहे.
