खोडाळ्यात दुषित पाणीपुरवठ्याची परिस्थिती ” जैसे थे “

खोडाळा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार

दीपक गायकवाड – मोखाडा

खोडाळा ग्रामपंचायत मार्फत खोडाळा परिसरात केला जाणारा पाणीपुरवठा मागील अनेक महिन्यांपासून अशुद्ध केला जात आहे.याबाबत वारंवार ओरड होऊनही खोडाळा ग्रामपंचायत प्रशासन जलशुद्धीकरणाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे खोडाळा ग्रामस्थांना आजही दुषित पाण्यावरच गुजरान करावी लागत आहे.खोडाळा ग्रामपंचायत प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

खोडाळा येथे जवळपास 50 लक्ष रुपये खर्चून अवाढव्य असे जलशुद्धीकरण केंद्र उभारलेले आहे.हे जलशुद्धीकरण केंद्र वेळोवेळी त्यात साठलेला मलमा, कचरा आदी टाकाऊ आणि दुर्गंधीयुक्त पदार्थ वेळीच स्वच्छ न केल्यामुळे मागील 3 वर्षापासून या जलशुद्धीकरण केंद्राद्वारे खोडाळकरांना शुद्ध पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे खोडाळा ग्रामस्थांनी वारंवार ओरड केल्यानंतर जल जीवन मिशन योजनेचे पाणी गावात पुरवठा करून अवघे काहीच दिवस खोडाळकरांच्या तोंडाला पाने पुसण्याची बेमालूम मखलाशी खोडाळा ग्रामपंचायतीने केलेली असून ग्रामस्थांची घोर फसवणूक आणि हेळसांड केलेली आहे.त्यामूळे ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारावर ग्रामस्थांमधून तीव्र असंतोषाचे वातावरण पसरलेले आहे.

♣️ जलजीवन म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा ♣️
मोखाडा तालुक्यात कोट्यावधी रुपये खर्चून जल जीवन मिशन योजना राबवण्यात येत आहे.परंतु या योजनेचा मोखाड्यातील बहुतांश गावांना काडी मात्रही उपयोग आज तागायत झालेला नाही.त्यातच जलजीवन मिशनचे 241 कोटी रुपये शासन दरबारी थकीत असल्यामुळे या योजनेवरील ठेकेदारांनीही काम करण्यासाठी सनदशिरपणे हात वर केले आहेत. एकीकडे शासन जल जीवन मिशन योजनेला सण 2028 पर्यंत वाढीव मुदत देत असले तरी थकीत पैशाबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने ही योजना म्हणजे काही गावांसाठी “असून अडचण नसून खोळंबा झालेली आहे”.

♥️ अशुद्ध पाणी निवडणूक गढूळ करणार..?♦️

खोडाळा येथे जलजीवनच्या जलकुंभांचा प्रश्न प्रलंबित असला तरी खोडाळा ग्रामपंचायतच्या पूर्वीच अस्तित्वात असलेल्या 2 जलकुंभांना जलजीवनची जोडणी करून दिल्यास खोडाळा नगरीत शुद्ध पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. तशी मागणीही खोडाळा ग्रामपंचायत ने जिल्हा प्रशासनाकडे नोंदवली आहे परंतु जल जीवन मिशनचे पाणी नक्की कुठे मुरते.? हा यक्षप्रश्न खोडाळा ग्रामस्थांना भेडसावत आहे.जलजीवन मिशन योजनेचे पाणी झारीतल्या शुक्राचार्या प्रमाणे कुठे अडले आहे. याचा लोकप्रतिनिधींनी शोध आणि बोध घेऊन खोडाळा ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचे शुद्ध पाणी पुरवण्याची खबरदारी घ्यावी अन्यथा आगामी निवडणुकीत त्याचा मोठा फटका प्रस्थापितांना बसणार आहे यात तीळमात्र शंका नसावी. त्यादृष्टीने लोकप्रतिनिधींनी तातडीने पावलं उचलणे त्यांच्याच हिताचे ठरणार आहे.

♣️पाठपुराव्याचं घोडं कुठं पेंड खातंय…♥️

जलजीवन मिशन च्या पाणीपुरवठा बाबत ग्रामपंचायत प्रशासन सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य मंडळ सकारात्मक आणि आग्रही असल्याचे दिसून येते.परंतु त्याबाबत खंबीर पाठपुरावा होत नसल्याने पाठपुराव्याचे घोडं कुठं तरी पेंड खात बसलं असल्यामुळे सद्या तरी खोडाळकरांच्या तोंडचे शुद्ध पाणी पळालेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *