केवळ अपेक्षित जागे अभावी ग्रामीण रुग्णालयाचे प्रदीर्घ स्वप्न धुसर

32 गुंठ्यांत बांधकामाचा प्रश्न बनला जटील..!

रुग्णांच्या अधिक वाढत्या संदर्भ सेवेमुळे
ग्रामीण रुग्णालयाचे महत्व अधोरेखित
खोडाळा विभागाची शोकांतिका कायम
हजारो रुग्णांवर होतोय दुरगामी परिणाम

दीपक गायकवाड – मोखाडा

खोडाळा येथील ग्रामीण रुग्णालयाची मागणी सन 2015-16 सालापासून केली जात होती. सन 2024-25 च्या अखेरीस ग्रामीण रुग्णालयाला मंजूरी देखील मिळाली आहे.व त्यासाठी सुमारे 5 कोटींचा निधी सुध्दा उपलब्ध झाला आहे.तत्पूर्वी खोडाळा ग्रामपंचायत ने येथील 598 आणि 528 गट नंबर मधील गावठाण जागा सुचवून कागदपत्रं आणि ठरावांची पुर्तता करुन दिली होती.त्याबरहूकुम पालघर जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाने दोन्हीही गटांची सरकारी मोजणी झालेली आहे. तथापी गट नंबर 528 मध्ये सर्वत्र अतिक्रमण आढळून आले आहे तर 598 मध्ये फक्त 32 गुंठे जागा खुली आढळून आली आहे. त्यामूळे केवळ 32 गुंठ्यांत ग्रामीण रुग्णालय उभारणे केवळ दुरापास्त असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे असल्याने खोडाळा आणि परिसराचे ग्रामीण रुग्णालयाचे स्वप्न धुसर झालेले आहे.

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंदामधून दरवर्षी संबंध वर्षभरात हजार ते दिड हजार रुग्णांना अद्ययावत उपचार मिळवून देण्यासाठी पुढे संदर्भ सेवा देण्यात येते. चालू वर्षात अवघ्या 7/8 महिन्यात 841 रुग्णांना संदर्भीत करण्यात आलेले आहे. त्यापैकी 53 महिलांना सुखरूप प्रसूतीसाठी तर गंभीर अपघात ग्रस्त 7 रुग्ण अधिक उपचारासाठी संदर्भीत करण्यात आलेले आहेत.तर उर्वरित रुग्ण हे संबंधित आजाराचे विशेषज्ञ आणि आधुनिक व अद्ययावत यंत्रसामग्री नसल्याने जिल्हा रुग्णालयात संदर्भीत करण्यात आलेले आहेत. केवळ त्या त्या आजाराचे विशेषज्ञ आणि सुविधां अभावी दरवर्षी हजार 12 शे रुग्णांना इतरत्र हलविण्यात येते.त्यामूळे खुद्द रोग पिडीत रुग्ण आणि निष्कांचन पालकांचे त्यामुळे प्रचंड हाल होतात व परिणामी रुग्णवाहिके अभावी आपल्या मृत अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घालून आणण्या इतपत अतिव वेदनादायी मनस्तापही त्यांना सहन करावा लागत आलेला आहे. तसेच केवळ अत्यावश्यक उपचार न मिळाल्याने झालेल्या दर हजारी मृत्यूंचे प्रमाणही लक्षणीय आहे.

खोडाळा गांव परिसरातील वाढती लोकसंख्या आणि नाशिक जिल्ह्यातील श्रीघाट, देवगाव, वैतरणा, आस्वली, कोजूली, सामूंडी ते थेट पहिणा येथूनही
प्राथमिक आरोग्य केंद्रावर वाढणारा रुग्णांचा प्रभाव तसेच खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील 24 महसुली गावे आणि जवळपास 60 हून अधिक गावपाडे संलग्न आहेत. त्यातच इगतपुरी व त्र्यंबक तालुक्यातील रुग्णांचा ओघही मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामानाने कमी पडणारी आरोग्य सेवा आणि संदर्भ सेवा मिळवताना आदिवासी निष्कांचन रुग्णांची होणारी दमछाक लक्षात घेऊन शासनाने येथील ग्रामीण रुग्णालयाला मंजूरी देण्याची मागणी सन 2016 पासून केली जात होती.

मोखाडा तालुक्यातील कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रे 4, आरोग्य पथके, दक्षता पथके 3 रेस्क्यू कॅंप 7, आयूर्वेदिक दवाखाना 1 आणि तब्बल 21 उपकेंद्राची उपाययोजना करुन लाखो रुपयांचा खर्च केला व करीत आहे. त्यापैकी खोडाळा विभागात 1 प्राथमिक आरोग्य केंद्र, 3 आरोग्य पथकं, 6 उपकेंद्र आणि 2 रेस्क्यू कॅंप च्या माध्यमातून आरोग्य सेवा कार्यरत आहे. मात्र असे असतानाही येथील आम जनतेला अधिकची आरोग्य सेवा मिळविण्यासाठी जव्हार, मोखाडा व नासिक येथील जिल्हा रुग्णालयावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामूळे परिसरातील नागरिकांना स्थानिक ठिकाणीच उत्तम आरोग्यसेवा मिळावी यासाठी येथील जनता खोडाळा येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे म्हणून शासनाच्या कानी कपाळी ओरडून दाद मागत होती. कधी नव्हे त्या मागणीचे अपेक्षित परिणाम रुग्णालय मंजुरी आणि निधीच्या उपलब्धीतून समोर दिसत असताना आता जागे अभावी त्याला खोडा बसलेला आहे.

“खास बाब म्हणून नियमाला बगल देण्याची गरज”
••••••••••••••••••••••••••••••••••

भौगोलिक परिस्थिती, दळणवळणाची साधन सुचिता,उपचारा अभावी झालेले मृत्यू, आरोग्य बाबतचे सामाजिक अज्ञान, त्यासाठी असलेली आरोग्य सेवेची नितांत निकड लक्षात घेऊन उपलब्ध मोकळ्या 32 गुंठ्यांत मजला पध्दतीने नियमांना बगल देऊन आरोग्य सेवा देणाऱ्या इमारतीं सोबतच निवासी सोय केल्यास हजारोंच्या संख्येने बाधीत होणाऱ्या जनतेला दिलासा मिळणार आहे.

कोट…..

“ याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाशी संपर्क साधला असता सरकारी मोजणी उपरांत 32 गुंठे खुली जागा आढळून आली असून ग्रामीण रुग्णालय बांधकाम करण्यासाठी 5 कोटी निधी उपलब्ध असल्याचे समजते. तसेच जागेचा तिढा सोडवण्यासाठी काय उपाययोजना केली आहे किंवा कसे याबाबत विचारणा केली असता वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार चालू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी सांगितले आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.