चालू विद्यूत पुरवठ्यातून खोडाळा येथील विद्यूत रोहीत्र चोरीला

दोन वर्षात दुसऱ्यांदा रोहीत्र चोरीला
सोलर पॅनल,पंपासह केबलची चोरी
अनिर्बंध भंगार चोरांचा सुळसुळाट
नळ योजनांना बसतेय कृत्रिम टाळेबंदी

दीपक गायकवाड – मोखाडा

मोखाडा तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या खोडाळा येथील ३ नंबर लाईनच्या विद्यूत पुरवठ्यासाठी बसवलेले विद्यूत रोहित्र चालू वीज पुरवठ्यात खोलून यांतील तांब्यांची वायंडींग जागेवरच खोलून भंगार माफीयांनी रात्रीच्या पोटात पोबारा केला आहे.ही घटना बुधवार दिनांक ३ रोजी घडली असून मागील दोन वर्षांतील याच ठिकाणाहून विद्यूत रोहीत्र चोरीला जाण्याची ही दुसरी घटना आहे.या घटनेची फिर्याद मोखाडा पोलिस ठाण्यात दाखल केली असल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले आहे.d

मोखाडा तालुका भंगार माफीया व गोवंश चोरांसाठी आंदन ठरत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेले अपघात अडथळे ( क्रॅश बॅरिअर्स ) , दिशा फलक इत्यादी लोखंडी ऐवज चोरी पाठोपाठ आता भंगार चोरांनी नळ पाणीपुरवठा योजनांकडे मोर्चा वळवला असून तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सोलर पॅनल,उपसा पंप आणि केबल चोरुन नेण्यात येत आहेत.त्यामूळे अशा नळ योजना बंद पडलेल्या असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

तालुक्यातील मौजे चास , धामणशेत, कारेगाव, साखरी, डोल्हारा व दुधगाव या सहा ग्रामपंचायत हद्दीतील नळ योजनांचे साहित्य चोरीला गेलेले आहे.मौजे चास व धामणशेत येथील केबलची 2 वेळेस चोरी झालेली आहे.तर साखरी, डोल्हारा, कारेगाव आणि दुधगाव येथील केबल आणि दुधगाव येथील तर केबल आणि पंप चोरट्यांनी लंपास केला आहे.त्यामूळे येथील सौर उर्जेवर चालणारी नळपाणी पुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत.खोडाळा येथील विद्यूत रोहीत्र चोरीमुळे येथील पाणीपुरवठा योजना बंद पडणार असून पर्यायाने ग्रामस्थांना कृत्रिम पाणी टंचाईशी सामना करावा लागणार आहे.

सन २०२४ मध्ये खोडाळा येथील शकूंतला शारंगधर भागवत या विधवा महिलेच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख ३० हजार रुपये चोरुन पोबारा केला आहे.सदर घटना खोडाळा पोलिस दुर क्षेत्राच्या हद्दीत घडली असून सदर घटनेची नोंद मोखाडा पोलिस ठाण्यात करण्यात आलेली आहे.

भंगार माफीयांसाठी मोखाडा तालुका हा उत्पन्नाचे साधन ठरला असून यापूर्वी लाखो रुपयांचे अपघात अडथळे, दिशा दर्शक फलक,विद्यूत रोहित्र आदी किंमती साहित्याची चोरी झालेली आहे.यात क्रॅश बॅरिअर्स अर्थात अपघात अडथळ्यांची तर सातत्याने चोरी होत असते.सार्वजनिक बांधकाम विभागाने नट बोल्ट ऐवजी वेल्डिंग करून क्रॅश बॅरिअर्स बसवले होते.त्यावरही कडी करुन चोरट्यांनी तेही बेमालूमपणे कापून लंपास केलेले आहेत.दरवर्षी सातत्य ठेवून क्रॅश बॅरिअर्स ची चोरी होवून लाखो रुपयांचा माल हडप केला जातो मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी क्रॅश बॅरिअर्स बसवले जात आहेत.त्यामूळे भंगार माफीयांसाठी मोखाडा तालुका हा आयतेच आंदन ठरत आहे.

दस्तूरखुद्द खोडाळा सारख्या गजबजलेल्या बाजारपेठेसह मौजे गोमघर,पाथर्डी,कारेगाव आदी परिसरातून गोवंश चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.अक्षरशः रात्रीच्या पोटात गोठ्यात बांधलेली दावणीचे जनावरेही चोरट्यांनी लंपास केलेली आहेत.त्यामूळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींशी सामना करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.