मागण्या मान्य न झाल्यास थेट मंत्रालयावर कूच करू; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सरकारला निर्वाणीचा इशारा

पालघर | जन मेट्रो विशेष प्रतिनिधी

पालघर: पालघरच्या भूमीवर पुन्हा एकदा लाल बावटा फडकला असून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI-M) नेतृत्वाखाली निघालेल्या भव्य ‘लॉंग मार्च’ने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. डहाणूच्या चारोटीतून सोमवारी (१९ जानेवारी) निघालेला हा विराट मोर्चा मासवणमार्गे आज (२० जानेवारी) संध्याकाळपर्यंत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात तब्बल ९० हजारांहून अधिक कष्टकरी, शेतकरी आणि आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत.


वाढवण आणि मुरबे बंदराला पहिलाच भव्य विरोध
​केवळ शेतकरी प्रश्नच नव्हे, तर जिल्ह्याच्या अस्तित्वाचा प्रश्न या मोर्चाने उपस्थित केला आहे.
बंदर विरोधी भूमिका: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी वाढवण आणि मुरबे बंदरांना विरोध करण्यासाठी काढण्यात आलेला हा पहिलाच सर्वात मोठा लॉंग मार्च आहे. हे प्रकल्प स्थानिकांचे रोजगार आणि पर्यावरण नष्ट करतील, अशी भीती व्यक्त करत हे प्रकल्प रद्द करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे.

आमदार विनोद निकोले यांचा इशारा
​लॉंग मार्चमध्ये सहभागी असलेले आमदार विनोद निकोले यांनी ‘जन मेट्रो’शी बोलताना सांगितले की, “आम्ही १० दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी मॅडमना आमच्या १२ मागण्यांचे निवेदन दिले होते. आज मोर्चा तिथे पोहोचल्यावर त्यावर चर्चा होईल.”

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या (सविस्तर)
​या मोर्चात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह, अखिल भारतीय किसान सभा आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच या संघटनाही सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
जमीन हक्क: देवस्थान इनाम जमिनी आणि वनजमिनी वर्षानुवर्षे कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात.
वीज बिल आणि स्मार्ट मीटर (तीव्र विरोध): ३ एचपी मोटार वापरणाऱ्या शेतकऱ्यांना १० ते २० हजार रुपये वीज बिल येत आहे. सक्तीचे स्मार्ट मीटर्स रद्द करून जुने मीटर्स कायम ठेवावेत.
मनरेगा आणि रोजगार: केंद्र सरकारने बदललेली मनरेगा योजना पूर्ववत करावी आणि १०० दिवस कामाची हमी द्यावी.
श्रमसंहिता आणि पेसा कायदा: कामगारविरोधी ४ श्रमसंहिता रद्द कराव्यात आणि पेसा (PESA) कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर कराव्यात / आदिवासी विरोधी बदल रद्द करावेत.


प्रशासनाला ‘अल्टीमेटम’
​मोर्चाचे नेतृत्व करणारे आमदार विनोद निकोले आणि ज्येष्ठ नेते अशोक ढवळे यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे:
अनिश्चितकालीन ठिय्या: आज जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत अनिश्चित काळासाठी ‘धरणे आंदोलन’ केले जाईल.
पुढील दिशा: जर प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर हा ९० हजारांचा जनसमुदाय ‘रेल रोको’ करेल किंवा पालघरवरून थेट मुंबईतील मंत्रालयाच्या दिशेने कूच करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

मोर्चाचा आतापर्यंतचा प्रवास (Update)
​लॉंग मार्चमधील हजारो आंदोलक मासवण येथे पोहोचले असून, तेथील सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:
​पार केलेले अंतर: काल चारोटी ते मनोर (३० किमी) आणि आज मनोर ते मासवण (८ किमी) असे एकूण ३८ किमी अंतर आंदोलकांनी पार केले आहे.
उर्वरित अंतर: पालघर जिल्हाधिकारी कार्यालय गाठण्यासाठी आता अवघे १२ ते १३ किमी अंतर बाकी आहे.
​वेळ: पुढील २ ते ३ तासांत हे अंतर कापून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोहोचेल.

पुढील अपडेट:
आज संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे लाल वादळ पोहोचेल. त्यानंतर प्रशासन आणि आंदोलक यांच्यात होणाऱ्या चर्चेकडे आणि निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या घडामोडींच्या क्षणाक्षणाच्या माहितीसाठी ‘जन मेट्रो’ पाहत रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.