“सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आहे का”

नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभारावर कोणी लक्ष देईल का? — आयुक्त साहेब, दखल घ्याल का?

नवी मुंबई (प्रतिनिधी):
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील बससेवा प्रवाशांच्या जीवाशी अक्षरशः खेळ करत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक बस मोडकळीस आलेल्या अवस्थेत, नादुरुस्त आणि अपघातप्रवण बनल्या आहेत, मात्र संबंधित विभाग मात्र डोळेझाक करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

दररोज हजारो प्रवासी नवी मुंबई महानगरपालिकेच्या बससेवेचा वापर करतात. मात्र अनेक बसमध्ये ब्रेक फेल, सस्पेन्शन खराब, गंजलेल्या बॉडी, फुटलेल्या सीट्स आणि तुटलेल्या खिडक्या असे दृश्य दिसते. काही बसमध्ये दरवाजे नीट बंद न होणे, इंजिनातून धूर निघणे, तसेच धोकादायक आवाज येणे अशा घटना वारंवार घडत असून, प्रवाशांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रारी नोंदवल्या, तरीही प्रत्यक्षात कोणतीही सुधारणा झालेली नाही. बसचालक आणि वाहक सुद्धा या परिस्थितीत त्रस्त आहेत. “अशा जीर्ण बस रस्त्यावर उतरवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देणे,” असे काही चालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरक्षित आणि सुस्थितीत असणे अपेक्षित आहे. मात्र सध्या परिस्थिती याच्या अगदी उलट दिसत आहे.

आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की —
नवी मुंबई महानगरपालिकेच्या या निष्काळजी कारभारावर कोणी लक्ष देणार?
आयुक्त साहेब स्वतः या गंभीर विषयाची दखल घेणार का?
प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन, नादुरुस्त बस तत्काळ मार्गावरून हटवून नवी बससेवा सुरु करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.