मुरबाड | प्रतिनिधी
शहरी भागात वाढत चाललेला पाश्चिमात्य प्रभाव, बदलती जीवनशैली आणि मूल्यांची घसरण पाहता आपली मराठी संस्कृती लयास चालली की काय, असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. एकेकाळी जुने कपडे शिवून अंग झाकणारी पिढी मागे पडत असून, नवे कपडे फाडून अंगप्रदर्शन करणारी पिढी पुढे येताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात आजही संतपरंपरा, वारकरी संप्रदाय आणि मराठी संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम सुरू असल्याचे चित्र दिसून येते.
ग्रामीण भागात हळदी-कुंकू, हरिनाम सप्ताह, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात संस्कारांची जपणूक होत आहे. हे उपक्रम मठ, आश्रम किंवा गावातील सार्वजनिक ठिकाणी आयोजित केले जात असले, तरी त्यासाठी मंडप, ध्वनी व्यवस्था, भोजन व्यवस्था आदी खर्चिक बाबी असल्याने दानशूर व्यक्तींच्या सहकार्याची नितांत गरज असते.
मुरबाड तालुक्यात सौ. अश्विनी हरेश खापरे दांपत्यासारख्या मराठी यशस्वी उद्योजकांकडून या उपक्रमांना मोलाचे योगदान मिळत आहे. त्यांच्या दातृत्वामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी साडेतीन दिवसांचे, सात दिवसांचे अखंड हरिनाम सप्ताह यशस्वीपणे पार पडत आहेत. या माध्यमातून संतपरंपरा, समाजप्रबोधन आणि मराठी संस्कृती जपली जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
समाजात अनेकांकडे संपत्ती असूनही दान देण्याची वृत्ती नसते, त्यामुळे अशा व्यक्ती समाजासाठी असून नसल्यासारख्या ठरतात, अशी खंतही व्यक्त केली जात आहे. भविष्यात खापरे दांपत्याच्या समाजसेवेचा वसा इतरांनीही अंगीकारल्यास समाजहितासाठी आणि मराठी संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी ते मोलाचे ठरेल, अन्यथा पुढील पिढीपासून हळदीचा मांडव, अक्षता आणि पारंपरिक संस्कारच नाहीसे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
