नवी मुंबई | प्रतिनिधी
नवी मुंबईतील खैरणे एमआयडीसी परिसरातील अग्निस फाईन वॉटर्स प्रायव्हेट लिमिटेड (प्लॉट क्र. ७८७) या कंपनीकडून गेल्या अनेक दिवसांपासून बाथरूममधील घाण व सांडपाणी थेट रस्त्यावर सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या सांडपाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर घाण साचली असून तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
सदर रस्त्यालगतच रिक्षा स्टँड असून, शेजारील कंपन्यांमध्ये ये-जा करणारा कामगार वर्ग तसेच स्थानिक नागरिकांना या अस्वच्छतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक कंपन्यांचे कर्मचारी याच मार्गाने ये-जा करत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
या संदर्भात जागरूक नागरिकांनी वेळोवेळी संबंधित कंपनी प्रशासनाला सांडपाणी योग्य पद्धतीने बंदिस्त नाल्यात सोडण्याबाबत सूचना व विनंती केली होती. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष करत कंपनीकडून सांडपाणी रस्त्यावरच सोडणे सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकाराची माहिती नागरिकांनी पत्रकार विष्णु बुरे यांना दिल्यानंतर ते घटनास्थळी जाऊन बातमी कव्हर करत असताना संबंधित कंपनीतील मॅनेजर अथवा सुपरवायझर पाठक नावाच्या व्यक्तीने फोनद्वारे संपर्क साधत ही बातमी प्रकाशित करू नये, अशी धमकी दिल्याचा आरोप पुढे आला आहे. “माझी खूप ठिकाणी ओळख आहे,” असे सांगत काही प्रतिष्ठित व्यक्तींची नावे घेऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगण्यात येत आहे.
सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न आणि नागरिकांच्या त्रासाची वस्तुस्थिती मांडणाऱ्या पत्रकाराला अशा प्रकारे धमकावले जाणे ही अत्यंत दुर्दैवी व चिंताजनक बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी नागरिकांसह पत्रकार संघटनांकडून रस्त्यावर सांडपाणी सोडणाऱ्या संबंधित कंपनीवर तात्काळ कारवाई करावी, पत्रकाराला धमकी देणाऱ्या पाठक नावाच्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी तसेच एमआयडीसी व महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
