खोडाळा येथून पुन्हा विद्यूत रोहित्र चोरीचा निष्फळ प्रयत्न

खोडाळा पोलिसांच्या शिताफीने वाचले रोहित्र

खोडाळा उपकेंद्रातून चोरीला वाढ
अनिर्बंध भंगार चोरांचा सुळसुळाट
नळ योजनेला कृत्रिम टाळेबंदी

दीपक गायकवाड – मोखाडा

मोखाडा तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या खोडाळा येथील ३ नंबर लाईनवर पाणी पुरवठा व इतर वापरासाठी बसवलेले विद्यूत रोहित्र चालू वीज पुरवठ्यात खोलून नेण्याचा प्रयत्न खोडाळा पोलिसांच्या शिताफीमूळे अयशस्वी झाला आहे.
शनिवार दि.२८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात भंगार माफीयांनी अवघ्या काही दिवसांतच तीसऱ्यांदा येथील विद्युत रोहित्र पळविण्याचा बेत आखला होता.परंतू खोडाळा पोलिसांनी हा प्रयत्न उधळून लावल्याने चोरट्यांनी सदर विद्युत रोहित्र जागेवरच लोटून पळ काढला आहे.परंतू सदरचे विद्युत रोहित्र निकामी झाल्याने खोडाळा ग्रामस्थांना हकनाक पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे.

रोहित्रातील तांब्यांची वायंडींग जागेवरच खोलून भंगार माफीया रात्रीच्या पोटात पोबारा करत असतात.यापूर्वीही घटना बुधवार दिनांक ३ एप्रिल २०२५ मध्येही अशाच प्रकारे चोरीची घटना घडली होती‌.अवघ्या २ वर्षांत याच ठिकाणाहून विद्यूत रोहीत्र चोरीला जाण्याची ही तीसरी घटना आहे.या घटनेची फिर्याद मोखाडा पोलिस ठाण्यात दाखल केली असल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले आहे.

मोखाडा तालुका भंगार माफीया व गोवंश चोरांसाठी आंदन ठरत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेले अपघात अडथळे ( क्रॅश बॅरिअर्स ) , दिशा फलक इत्यादी लोखंडी ऐवज चोरी पाठोपाठ आता भंगार चोरांनी नळ पाणीपुरवठा योजनांकडे मोर्चा वळवला असून तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सोलर पॅनल,उपसा पंप आणि केबल चोरुन नेण्यात येत आहेत.त्यामूळे अशा नळ योजना बंद पडलेल्या असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

तालुक्यातील मौजे चास , धामणशेत, कारेगाव, साखरी, डोल्हारा व दुधगाव या सहा ग्रामपंचायत हद्दीतील नळ योजनांचे साहित्य चोरीला गेलेले आहे.मौजे चास व धामणशेत येथील केबलची 2 वेळेस चोरी झालेली आहे.तर साखरी, डोल्हारा, कारेगाव आणि दुधगाव येथील केबल आणि दुधगाव येथील तर केबल आणि पंप चोरट्यांनी लंपास केला आहे.त्यामूळे येथील सौर उर्जेवर चालणारी नळपाणी पुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत.खोडाळा येथील विद्यूत रोहीत्राची चोरी फसली असली तरी.येथील विद्युत रोहित्र डिसमेंटल करताना नादुरुस्त झाल्याने येथील पाणीपुरवठा योजना बंद पडणार असून पर्यायाने ग्रामस्थांना कृत्रिम पाणी टंचाईशी सामना करावा लागणार आहे.

महावितरणच्या खोडाळा उपकेंद्राच्या हद्दीतून आज अखेर दरम्यानच्या कालावधीत एकूण ८ विद्युत रोहित्रांना भंगार माफियांनी लक्ष बनवलेलं आहे.यांतील ५ विद्युत रोहित्र तर दस्तुरखुद्द खोडाळा आणि परिसरातील आहेत.तर इतर ३ कुर्लोद आणि पाथर्डी हद्दीतील आहेत.या आठही विद्यूत रोहित्रांपैकी वर्तमान स्थितीतील शनिवार दि २८ फेब्रुवारीची फसलेली चोरी वगळता इतर ७ ही विद्युत रोहित्र भंगार माफियांनी बेमालूमपणे लंपास केलेले आहेत.

भंगार माफीयांसाठी मोखाडा तालुका हा उत्पन्नाचे साधन ठरला असून यापूर्वी लाखो रुपयांचे अपघात अडथळे, दिशा दर्शक फलक,विद्यूत रोहित्र आदी किंमती साहित्याची चोरी झालेली आहे.यात क्रॅश बॅरिअर्स अर्थात अपघात अडथळ्यांची तर सातत्याने चोरी होत असते.सार्वजनिक बांधकाम विभागाने नट बोल्ट ऐवजी वेल्डिंग करून क्रॅश बॅरिअर्स बसवले होते.त्यावरही कडी करुन चोरट्यांनी तेही बेमालूमपणे कापून लंपास केलेले आहेत.दरवर्षी सातत्य ठेवून क्रॅश बॅरिअर्स ची चोरी होवून लाखो रुपयांचा माल हडप केला जातो मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी क्रॅश बॅरिअर्स बसवले जात आहेत.त्यामूळे भंगार माफीयांसाठी मोखाडा तालुका हा आयतेच आंदन ठरत आहे.

दस्तूरखुद्द खोडाळा सारख्या गजबजलेल्या बाजारपेठेसह मौजे गोमघर,पाथर्डी,कारेगाव आदी परिसरातून गोवंश चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.अक्षरशः रात्रीच्या पोटात गोठ्यात बांधलेली दावणीचे जनावरेही चोरट्यांनी लंपास केलेली आहेत.त्यामूळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींशी सामना करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *