कुचकामी जलशुध्दीकरण यंत्रणेमुळे खोडाळ्यात दुषीत पाणी पुरवठा

जलशुध्दीकरण यंत्रणा दुरुस्त करा
अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडणार
खोडाळा ग्रामपंचायतीचा इशारा

त्वचा रोगाने ग्रामस्थ हैराण
पोटाचे विकार बळावणार

दीपक गायकवाड – मोखाडा

मोखाडा तालुक्यातील खोडाळा ही महत्वाची बाजारपेठ आहे.येथे मोठ्या प्रमाणावर विस्तारित लोकसंख्या असून बाजारकरुंचे आवागमणही लक्षणीय आहे.मात्र येथे शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी लक्षावधी रुपये खर्चून उभारलेले जलशुद्धीकरण केंद्र मागील अनेक महिन्यांपासून नादुरुस्त झालेले असल्याने खोडाळकरांना सद्या तरी दुषीत पाण्यावरच गुजराण करावी लागत आहे.परिणामी त्यांना त्वचारोग आणि पोटाच्या विकारांशी सामना करावा लागत आहे.ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन खोडाळा ग्रामपंचायतीने आंदोलनाचा पवित्रा घेतला असून त्याद्वारे जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्ती बाबत आणि तुर्तास जुन्या जलकुंभांना जलजीवनची जोडणी करून देण्याबाबत पाणी पुरवठा विभागाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

खोडाळा येथे जलजीवन मिशन अंतर्गत काम सुरु आहे.येथे एकूण 4 जलकुंभ उभारण्यात येत असून पैकी 3 जलकुंभ तयार झालेले आहेत.परंतू मुख्य बाजारपेठ आणि लगतच्या परिसरात अंतर्गत जलवाहिनीचे काम करताना अडचण उद्भवणार असल्याचे तसेच त्यासाठी निधीचा तुटवडा असल्याचे कारण पुढे करत संबंधित ठेकेदाराने येथील जलजीवनचे काम करण्यास असमर्थता दाखवली आहे.तर सद्यस्थितीत नळ पाणी पुरवठा करण्यासाठी बांधलेले जुन्या 2 जलकुंभाद्वारे खोडाळा परिसरात पाणी पुरवठा सुरु आहे.परंतु नादुरुस्त जलशुद्धीकरण केंद्रामुळे पिण्यासाठी अयोग्य आणि गाळ मिश्रित पाणी पुरवठा होत असल्याने जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग आणि जलजीवन मिशनने समन्वयाने जनहित लक्षात घेऊन नियमांना बगल देत येथील जुन्या जलकुंभांना तुर्तास जलजीवनची जोडणी करून देण्याची आग्रही मागणी खोडाळा ग्रामपंचायतीने नोंदवलेली आहे.त्यामूळे सद्या अंतर्गत जलवाहिनींचा प्रश्न निकाली निघणार असून ग्रामस्थांनाही हक्काचे स्वच्छ पाणी मिळणार आहे.ही मागणी यथोचित असल्याने वरिष्ठ पातळीवर हिरवा कंदील दाखवला जाईल अशी अपेक्षा आहे.

1 } खोडाळा येथे मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे.परंतु त्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साठलेला आहे.सदरच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीची बाब ही तांत्रिक असून त्यात पाणी शुध्द करण्यासाठी असलेल्या जाळ्या जाम झालेल्या आहेत.त्यांची दुरुस्ती अथवा नुतनीकरण करणे गरजेचे आहे.त्याबाबत जिल्ह्याशी बोलणं झालं आहे.तुर्तास जुन्या जलकुंभांना जोडणी करून देण्याची मागणी नोंदवली आहे.अन्यथा त्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल.

कविता प्रभाकर पाटील
सरपंच, खोडाळा ग्रामपंचायत

2 } खोडाळा येथील जलजीवनचे काम तातडीने सुरू करावे यासाठी मोखाडा येथे झालेल्या जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत मी आग्रही मागणी नोंदवली आहे.तथापी तात्पुरत्या स्वरुपात जुन्या जलवाहिनींचा वापर करून येथील कार्यान्वित जलकुंभांना जोडणी करून देण्याबाबत पालघर लोकसभा खासदार डॉ हेमंत सवरा यांनीही या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना सुचना केलेली आहे.तथापी त्यालाही बराचसा अवधी उलटला आहे.जनतेच्या सुरक्षेसाठी आंदोलन हाच एकमेव पर्याय आहे.

उमेश येलमामे
उपसरपंच, खोडाळा ग्रामपंचायत

♥️ अन्यथा खोडाळ्यात पाणी पेटणार.?♥️

एकूणच वरिष्ठ अधिकाऱ्यांच भुमिकेचा आढावा जाणून घेण्यासाठी जेजेएम आणि जिपच्या पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही.मात्र ग्रामपंचायतीच्या न्याय्य मागणीवर उभयपक्षी वरिष्ठ प्रशासन काय धोरणात्मक पाऊल उचलते हे पाहणे अगत्याचे ठरणार आहे.अन्यथा उन्हाच्या वाढत्या काहीलीत खोडाळ्याचे पाणी पेटण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *