पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यात दारू तस्करांनी नवी शक्कल लढवत औषधांच्या नावाखाली दारूची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलासरी तालुक्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ७ फेब्रुवारी रोजी रात्री पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यतिश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर सापळा रचला. रात्री साडेनऊच्या सुमारास हिमाचल-पंजाब ढाब्याजवळून जाणाऱ्या एका टाटा टेम्पोला थांबवण्यात आले. वाहनचालकाने आपण औषधांचा साठा घेऊन जात असल्याचे सांगत म्हणे वैद्यकीय कंपनीचे बिलही दाखवले.
मात्र पोलिसांना संशय आल्याने वाहनाची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान औषधांच्या बॉक्सच्या आड लपवून ठेवलेले तब्बल ४०० बॉक्स दारू आढळून आली. ही दारू वेगवेगळ्या ब्रँडची असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संपूर्ण साठा जप्त करत वाहनचालक शिवेंद्रकुमार लालबाबू ठाकूर (वय ४१, रा. मुंबई) याला ताब्यात घेतले आहे.
औषधे ही अत्यावश्यक सेवा असल्याचा गैरफायदा घेत तस्करांनी पोलिस तपास चुकवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दारू कुठून आणली आणि कुठे नेली जात होती, याचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे दारू तस्करीसाठी नवनव्या मार्गांचा वापर होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, पोलिसांनी अशा प्रकारांवर कडक नजर ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
