जव्हारमध्ये दोन दिवसीय जिल्हास्तरीय साहित्य महोत्सवाला साहित्यिक–रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
जव्हार प्रतिनिधी :
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय, जव्हार (जि. पालघर) यांच्या वतीने आयोजित पालघर जिल्हास्तरीय साहित्य संमेलन शनिवार दि. २७ व रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी ग. बा. सरदार साहित्य नगरी, राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय, जव्हार येथे अत्यंत उत्साहात व सांस्कृतिक रंगतदार वातावरणात संपन्न झाले.


संमेलनाची सुरुवात गांधी चौक येथून काढण्यात आलेल्या भव्य ग्रंथदिंडीने झाली. ग्रंथदिंडीचे पूजन संमेलनाध्यक्ष प्रा. अशोक ठाकूर व जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी पारंपरिक नृत्य, रंगीबेरंगी वेशभूषा आणि शाळा–महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे ग्रंथदिंडीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
यानंतर संमेलनाचे उद्घाटन विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र सखाराम भोये व जव्हार नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पूजा कुणाल उदावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. अशोक ठाकूर (माजी केंद्रीय अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद), असिफ लूलानिया (चेअरमन, अर्बन बँक), ज्योतीताई भोये (चेअरपर्सन, सुहासिनी नागरी पतसंस्था), दिलीप कोरे (अध्यक्ष, कोकण विभागीय ग्रंथालय संघ, महाराष्ट्र राज्य), प्रशांत पाटील (जिल्हा ग्रंथालय अधिकारी), दिलीप पटेकर (संचालक, आदिवासी विकास महामंडळ), कोकण साहित्य भुषण प्रवीण ना.दवणे (जिल्हाध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद, पालघर), राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष कमलजीत धानमेहेर ,कार्यवाह मनोज कामडी नवनिर्वाचित नगरसेवक व ज्येष्ठ साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचे स्वागत जिजाऊ अंध शाळा झडपोली येथील विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात इशस्त्वन व स्वागत गीताने केले.
उद्घाटनप्रसंगी मान्यवरांचे सन्मानचिन्ह,वृक्ष कुंडी वआयडॉल आदिवासींचे पुस्तक देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या जव्हार नगरपरिषद नवनिर्वाचित नगराध्यक्षा पूजा उदावंत यांनी वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी नगर परिषद सदैव सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. आमदार हरिश्चंद्र भोये यांनी ११४ वर्षांची परंपरा असलेल्या राजे यशवंत सार्वजनिक वाचनालयाचे कौतुक करत, आपण स्वतः या वाचनालयाचे वाचक असल्याचे अभिमानाने सांगितले. तसेच वाचनालयाच्या बाजूला स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.संमेलनात सहभागी सर्व कलाकार व साहित्यरसिकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरले ते दिव्यांग लेखक नवनाथ तांडेल (सातपाटी) लिखित ‘सागर कन्या’ या मांगेला समाजातील महिलेच्या संघर्षावर आधारित पहिल्या कादंबरीचे प्रकाशन, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी विशेष सत्कार म्हणून पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातून पहिले यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत रुजू झालेले डॉ. अजय काशीराम डोके (भा. प्र.से.), १०० किमी धावण्याच्या स्पर्धेत जागतिक पातळीवर यश संपादन करणारे विशाल वळवी तसेच ‘कोण बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी झालेले ओमकार उदावंत यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद मेघपुरीया यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश चुंबळे यांनी केले.
दुपारच्या सत्रात “पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बोलीभाषांचे भवितव्य” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादाचे सत्राध्यक्ष प्रवीण ना. दवणे (जिल्हाध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद व संपादक – साप्ताहिक आजचा तटरक्षक) होते. परिसंवादात योगेश गोतारने (ज्येष्ठ साहित्यिक), रवी बुधर (ज्येष्ठ साहित्यिक), प्रा. डॉ. राहुल पाटील (मराठी विभाग प्रमुख, जव्हार महाविद्यालय) यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले. सूत्रसंचालन किशोर डोके यांनी केले.
यानंतर “पालघर जिल्ह्यातील लोककलांचा सांस्कृतिक अविष्कार” या कार्यक्रमात आदिवासी तारपा नृत्य, सांभाळ नृत्य, टिपरी नृत्य, बोहाडा नृत्य तसेच विविध विनोदी कलाकारांच्या सादरीकरणाने संमेलनाला वेगळीच रंगत मिळाली. या सत्राच्या क्षेत्राध्यक्ष सुजाता जाधव ( निवेदिका) होत्या. सूत्रसंचालन मनोज कामडी व प्रा. ज्योत्स्ना राव यांनी केले.
दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी दुसऱ्या दिवशी निमंत्रित कवींचे कवीसंमेलन आयोजित करण्यात आले. या सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी रवी बुधर होते. पालघर जिल्ह्यातील बोलीभाषेतील ३२ नामवंत कवींनी आपल्या कवितांच्या सादरीकरणातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तसेच या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणजे विजया टाळकुटे गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या सुरेल आवाजात एक गझल गाऊन सर्वांचे मन जिंकली.
दुपारच्या सत्रात बोलीभाषा कथाकथन आयोजित करण्यात आले. या सत्राचे अध्यक्ष देवचंद महाले (ज्येष्ठ साहित्यिक व कवी) होते. चंद्रकांत घाटाळ (ज्येष्ठ कथालेखक व खगोलतज्ञ), प्रा. डॉ. राजू शनवार (बहुचर्चित ‘पोश्यापोर’ आत्मचरित्रकार), रमेश पागधरे (नाट्य लेखक, निर्माते, दिग्दर्शक व अभिनेता) आणि वीणा माच्छी (ज्येष्ठ साहित्यिका) यांनी आपल्या बोलीभाषेतील कथांचे प्रभावी सादरीकरण केले.या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. सुधीर भोईर यांनी केले.
संमेलनाचा समारोप संमेलनाध्यक्ष प्रा. अशोक ठाकूर यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला. मराठी भाषा व बोलीभाषा टिकवण्यासाठी अशा साहित्यिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. समारोप सत्राचे सूत्रसंचालन डॉ. अनिल पाटील यांनी केले.
या दोन दिवसीय संमेलनात हजारो साहित्यिक, कलाकार व साहित्यरसिकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष कमलजीत धानमेहेर, कार्यवाह मनोज कामडी, उपाध्यक्ष हर्षद मेघपुरिया, सदस्य प्रकाश चुंबळे, डॉ. अनिल पाटील, सुनीता उबाळे, प्रवीण भावसार, ऍड. पारस सहाणे, ग्रँथपाल युवराज भोये, सहाय्यक ग्रँथपाल मनीषा वाणी व कर्मचारी वृंद, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा जव्हार, ज्येष्ठ नागरिक संस्था, जव्हार तालुका पत्रकार संघ, जव्हार यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर जिल्हा स्तरीय साहित्य संमेलनाची सांगता शितल साईनाथ बेदडे यांच्या सुरेल आवाजात पसायदानाने करण्यात आली.
