मुरबे बंदर जनसुनावणी शांततेत पार पडली

९ हजार नागरिकांचा सहभाग,

८ हजारांहून अधिक हरकतींची नोंद

पालघर, दि. ६ ऑक्टोबर: जेएसडब्ल्यू मुरबे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रस्तावित मुरबे बंदर उभारणी प्रकल्पासंदर्भातील पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी आज पालघर येथे शांततेत पार पडली. सुनावणीचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी भूषवले.

सदर जनसुनावणीचे आयोजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ११:०० वाजता जिल्हा क्रीडा संकुल, दांडेकर कॉलेजजवळ, पालघर येथे करण्यात आले होते. सुनावणीस मुरबे परिसरासह पंचक्रोशीतील व जिल्ह्यातील अंदाजे ९ हजार नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सुनावणी दरम्यान जवळपास ८ हजार हरकती व आक्षेप प्राप्त झाले. सुनावणीदरम्यान एकूण १०३ नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली मते, हरकती आणि सूचना नोंदवल्या. नागरिकांनी मच्छीमार समाजाचा रोजगार, सागरी जैवविविधतेवर होणारे परिणाम, तसेच पर्यावरण आघात मूल्यांकन अहवालातील (EIA Report) यांसंबंधी मुद्दे मांडले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सुनावणीचे संयोजक वीरेंद्रसिंग, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर यांनी प्रस्तावना केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने सुनावणीला प्रारंभ झाला. प्रकल्प प्रवर्तकांच्या वतीने तांत्रिक सादरीकरण करण्यात आले.

सुनावणीच्या शेवटी किरण हसबनीस, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणे यांनी उपस्थित सर्व मुद्द्यांची नोंद इतिवृत्तात करण्यात येईल, तसेच हे इतिवृत्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल आणि प्राप्त आक्षेप रेग्युलेटरी ऑथॉरिटीकडे पाठविले जातील, अशी माहिती दिली.

सुनावणीची प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थितपणे पार पडण्यासाठी तसेच. सुनावणीच्या सुरळीत आयोजनासाठी पोलीस प्रशासन, महसूल विभाग, ग्रामपंचायत पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी १२४ पोलीस अधिकारी, १०६९ पुरुष व महिला अंमलदार, ८ स्ट्रायकिंग पथके, १ एसआरपीएफ (राज्य राखीव पोलीस दल), २ आरसीपी, २ जलद प्रतिसाद पथके, तसेच वाहतूक नियंत्रणासाठी ३ अधिकारी व ३२ अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली होती. संपूर्ण बंदोबस्ताचे नेतृत्व पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी केले.
डॉ. इंदु राणी जाखड यांनी उपस्थित सर्व नागरिकांचे संयमपूर्वक सहभागाबद्दल आभार मानून जनसुनावणीची सांगता सायंकाळी ५:३० वाजता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.