राज्य महामार्गावरील तो खड्डा देतो अपघाताला आमंत्रण

बांधकाम विभागाला महामार्गाचा पडला विसर

दुर्गम भागातील रस्त्यांना सापत्न वागणूक

दीपक गायकवाड – मोखाडा

पालघर, मनोर, वाडा, देवगाव महामार्ग क्रमांक 34 वर खोडाळा पासून पुढे दोन ते अडीच किलो मिटरवर वाघ्याची वाडी दरम्यान तीव्र वळणावर महामार्गाला मोठा खड्डा पडलेला आहे.हा खड्डा येथून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांना धोकादायक ठरला असून कोणत्याही क्षणी मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा यांना या मार्गाचा सपशेल विसर पडलेला आहे. एखादी दुर्घटना झाल्यावर किंवा जीवित हानी झाल्यावरच बांधकाम विभागाचे डोळे उघडणार आहेत का ? असा प्रक्षोभक सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

पालघर, मनोर, वाडा, देवगाव राज्य महामार्ग क्रमांक 34 हा वाडा उपविभागाच्या अख्त्यारीत येतो परंतु वाडापासून पुढे थेट श्रीघाट पर्यंत वाडा उपविभागाने हा राज्य महामार्ग दुर्लक्षित ठेवलेला आहे त्यामुळे या रस्त्याची अक्षरशः वाताहात झालेली आहे.

वाघ्याचीवाडी येथील हा खड्डा दिवसेंदिवस ” आ ” वासून मोठा होत आहे तसेच या रस्त्याला खालच्या बाजूनेही मोठे भगदाड पडायला सुरुवात झालेली आहे. भविष्यात हा रस्ता खचून दीर्घकाळ वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. परिणामी वाडा पालघर नंदुरबार सफाळे आदी भागातून या मार्गावर चालणाऱ्या परिवहन सेवा खंडीत होण्याची भीती आहे. दुर्गम भागातून वाहतूक व्यवस्था कमी असल्याने या भागातील प्रवाशांचा परिवहन सेवेवरच मोठा भार आहे.ही परिवहन सेवा खंडित झाल्यास ग्रामीण आदिवासी पट्ट्यातील प्रवाशांचे आवागमन थांबणार आहे.

मौजे आमला, परळी, सूर्यमाळ, केवनाळे भवानीची वाडी या अतिदुर्गम गावांसह दस्तूर खुद्द खोडाळा येथून सफाळा आणि पालघर आगारच्या बसेसवर अवलंबून असतात. खोडाळा येथे बाजार हाट करणे किंवा नाशिक घोटी इगतपुरी तसेच तालुक्याच्या गावी मोखाडा किंवा जव्हार येथे कार्यालयीन कामासाठी किंवा आरोग्यसेवा मिळविण्यासाठी खोडाळा येथून पुढे मार्गस्थ व्हावे लागते. परंतु परिवहन सेवा खोलंबळी तर दुर्गम भागातील अत्यावश्यक रुग्णांना आरोग्यसेवा मिळविणे दुरापास्त होणार आहे. पावसाळा अगदीच तोंडावर आलेला असल्याने या रस्त्याची देखभाल दुरुस्ती किंवा पूर्ण अद्ययावतीकरण करणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा या रस्त्याबाबत कोणती भूमिका घेते हे पाहणे अगत्याचे ठरणार आहे.अन्यथा वाडा उपविभागाला या भागातील प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

♥️ निद्रिस्त बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार ♣️

तब्बल दोन वर्षांपूर्वी पासून पावसाळ्याच्या मध्यावरच येथील तीव्र उताराच्या वळणावर हा खड्डा पडलेला आहे.सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोखाडा यांनी खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी बॅरिगेट्स व सुचनाफलक लावून प्रामाणिकपणे उत्तरदायित्व पार पाडले आहे. परंतु ज्या वाडा उपविभागाची जबाबदारी असतानाही साखरझोपेत असलेल्या वाडा उपविभागाने साधे ढुंकूनही पाहिले नाही याचे आश्चर्य वाटते. किमान आता तरी वाडा उपविभागाचे डोळे उघडतील काय ? असा परखड सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *