पत्रकारांच्या मागण्यांवर शासनाशी सकारात्मक चर्चा; वाशीम अधिवेशनातील ठरावांचे मुख्यमंत्री व मंत्र्यांना निवेदन!

डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या पुढाकाराने पत्रकारांच्या मागण्यांचा मुद्दा थेट शासन दरबारी!

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वाशीम येथे नुकतेच २७ वे राज्य अधिवेशन संपन्न झाले होते. या अधिवेशनात पत्रकारांच्या हितासाठी विविध महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले होते. त्या ठरावांचे सविस्तर निवेदन आज मुंबईतील विधान भवन येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विविध विभागांच्या मंत्र्यांना सादर करण्यात आले.

राज्य सरचिटणीस तथा दैनिक ‘समर्थ गांवकरी’चे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सदस्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन वाशीम अधिवेशनात मंजूर झालेल्या पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यामध्ये पत्रकारांची सुरक्षा, मानधनवाढ, आरोग्य व अपघात विमा योजना, शासकीय सवलती तसेच पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचा समावेश होता. या सर्व मुद्द्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका दर्शवली असून लवकरच ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या भेटीदरम्यान नूतन राज्यसभा खासदार रामराव वडकुते, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, नरहरी झिरवाळ, शिक्षणमंत्री दादा भुसे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आदिती तटकरे, पंकजा मुंडे यांच्यासह संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, आमदार हिरामण खोतकर, काशिनाथ दाते, विक्रमसिंह पाचपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा ‘समर्थ गांवकरी’ दिनदर्शिका व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार वाणी यांच्यासह अनेक पत्रकार प्रतिनिधींनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.

या प्रसंगी संजय फुलसुंदर (महाव्यवस्थापक, दैनिक समर्थ गांवकरी), नयन डुंबरे (मंत्रालय संपर्कप्रमुख) तसेच विष्णू बुरे (मंत्रालय प्रतिनिधी) यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

एकूणच, वाशीम अधिवेशनात मांडण्यात आलेल्या पत्रकारांच्या विविध मागण्यांवर शासन स्तरावर सकारात्मक निर्णय होतील, अशी आशा या भेटीद्वारे व्यक्त करण्यात आली असून पत्रकारांच्या हक्कांसाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *