सायदे आणि बारा पाड्यात तीव्र पाणीटंचाई
जेजेएमच्या अपूर्ण कामामुळे पाण्याचे दुर्भिक्ष
दीपक गायकवाड – मोखाडा
सायदे महसूल ग्रामपंचायत हद्दीतील मौजे वाघ्याची वाडी, सावरपाडा, हट्टीपाडा, अंधेरवाडी, हुंड्याची वाडी, बादलपाडा, खडकवाडी, मारुतीचीवाडी, बोरीचीवाडी, जांभूळवाडी इत्यादी 12 गाव पाड्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे येथे तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी यासाठी सायदे आणि बारा गाव पाड्यातील ग्रामस्थांनी थेट जलजीवन मिशन च्या टाकीजवळ धडक धरणे आंदोलन केले आहे. यावेळी पाण्याची व्यवस्था करा अन्यथा धरणे आंदोलन तीव्र करू असा एकच सूर येथील ग्रामस्थांनी लावला होता. त्यापुढे जलजीवन मिशनचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी नमते घेऊन 31 मार्च पर्यंत काम चालू करण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे तूर्तास हे धरणे आंदोलन रहित झाले असले तरी पुन्हा येथील पाणी पेटण्याची दाट शक्यता ग्रामस्थांच्या चर्येवरून दिसून आली आहे.
मोखाडा तालुक्यात सर्वत्र शेकडो कोटीची जलजीवन मिशनची कामे करण्यात आलेली आहेत. यातील काही ठिकाणी हर घर नल योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. तर काही ठिकाणी नुसत्याच टाक्या उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळे टाकीत पाणी दिसत असले तरी ग्रामस्थांना त्याचा उपभोग घेता येत नाही. व येथून पाण्यासाठी बसवलेल्या व्हाल्व्ह मधून तहानलेल्या ग्रामस्थांनी परस्पर पाणी उपसा केला तर अशा ग्रामस्थांवर पोलीस तक्रार दाखल करण्याचे धमकी संबंधितांकडून दिली जात आहे.तसेच या ठिकाणी जलजीवन मिशनचे काम झाले असल्यामुळे टँकर द्वारे पाणीपुरवठाही केला जात नाही त्यामुळे येथील ग्रामस्थांची “आई जेवू घालीना, तर बाप भीक मागू देईना” अशी अवस्था झालेली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही होणे अपेक्षित आहे परंतु जल जीवन मिशनचे करोडो रुपये निधी ठेकेदारांना देय्य असल्याने थकीत निधी मिळत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदारांनी काम करण्यासाठी हात आखडता घेतलेला आहे त्यामुळे ज्यांच्यासाठी या योजनेचा घाट घातला आहे तेच आज चातकासारखे तहानलेले राहिलेले आहेत. एकीकडे शासन निरनिराळ्या योजना काढून त्यासाठी निधीची तरतूद करीत आहे परंतु पाण्यासारख्या अत्यावश्यक बाबतीत मात्र कमालीची दिरंगाई होत आहे.
दरम्यान जल जीवन मिशनचे कनिष्ठ अभियंता कुणाल पवार आणि संबंधित गावासाठीच्या योजनेचे उप ठेकेदार श्रीमान मोदी यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु तहानलेले ग्रामस्थ धरणे आंदोलनावर ठाम होते. एक तर काम पूर्ण करण्याची निश्चित तारीख लेखी स्वरूपात द्या..! आणि तोपर्यंत आमची पाण्याची सोय करून द्या..! असा सूर सर्व ग्रामस्थांनी लावला होता त्यामुळे जल जीवन मिशन ने येथील ग्रामस्थांना दिनांक 31 मार्च पर्यंत कामाला सुरुवात करतो, तसेच ज्या ठिकाणी व्हाल्व्ह मधून पाणी देणे शक्य नसेल तेथे टँकरद्वारे तर इतर ठिकाणी व्हाल्व्ह द्वारे पाणी देण्याचे लेखी अभिवचन दिले आहे. त्यामुळे येथील धरणे आंदोलन सध्या रहित करण्यात आलेले आहे परंतु जलजीवनसाठी निधीच उपलब्ध झाला नाही तर येथील कामे करणे दुरापास्त असल्याने येथील ज्वलंत पाणी प्रश्न पुन्हा नव्या दमाने पेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आजच्या आंदोलनातील लेखी पत्राचे अपेक्षित फलित मिळाले असले तरी आम्ही जोपर्यंत पाणी मिळत नाही. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आमच्यावर कितीही केसेस झाल्या तरी त्या आम्ही झेलायला तयार आहोत. परंतु आमचा पाण्याचा न्याय हक्क मिळविल्याशिवाय राहणार नाही. निधीची अडचण ही शासनाने कोणत्याही मार्गाने पुरी करावी परंतु आम्हाला आमचे हक्काचे पाणी दिलेच पाहिजे.अन्यथा अधिक तीव्रतेने आंदोलन छेडावे लागेल.
श्री. सिंधू संजय झुगरे
सरपंच
ग्रामपंचायत सायदे
