मोखाड्यातील गावपरिसर झाला लख्ख
दीपक गायकवाड – मोखाडा
ज्येष्ठ समाजसुधारक व आद्य निरुपणकार डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त मोखाडा तालुक्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत खोडाळा येथील झालेल्या स्वच्छता मोहिमेत 60 श्रीसदस्य सहभागी झाले होते. दिवसभरात मुबलक कचर्याचे संकलन करून खोडाळा बाजारपेठेसह लगतच्या वाडी वस्तीवरील परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध समाजोपयोगी उपक्रमामुळे या प्रतिष्ठानचे कार्य सर्वत्र पोहोचले आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व संवर्धन, विहिरी-नद्या साफसफाई, जल पुनर्भरण, पाणपोई, बंधारा उपक्रम, शैक्षणिक साहित्य वाटप व स्वच्छता अभियान यांचा समावेश असतो. याची दखल घेऊन तत्कालीन राज्यपालांनी डॉ. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केले आहे.
ज्येष्ठ निरुपणकार डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेल्या बैठकीतून मोखाडा तालुक्यातील शेकडो श्रीसदस्य भक्ती मार्गाकडे वळलेले आहेत.मोखाडा तालुका हा सर्वार्थाने मागासलेला तालुका म्हणून लौकिक अर्थाने प्रचलित होता.कालौघात शिक्षणाचे महत्त्व पटल्याने कुटूंबची कुटुंब सुशिक्षित होऊन चांगले अर्थार्जन करु लागल्याने रुढार्थाने मागासलेपण मिरवणाऱ्या तालुक्याने मागासलेपणाची ओळख समूळ पुसून टाकत प्रगतीच्या दिशेने वाटचाल केलेली आहे.”सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे ! परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे.” या उक्तीला साजेशी अध्यात्माची जोड बैठकीच्या माध्यमातून मिळाल्यामूळे एकूणच अध्यात्मिक उन्नती होऊन अखंड श्री सदस्यांनी विनयभाव संपादीत केलेला आहे.
