नवी मुंबईत वाहनचोरीच्या दोन टोळ्यांचा पर्दाफाश; ४३ चोरीची वाहने जप्त

नवी मुंबई | प्रतिनिधी

नवी मुंबई आणि परिसरात वाढलेल्या दुचाकी व रिक्षा चोरीच्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून, एकूण ४३ चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वाहनांची किंमत ४६ लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई गुन्हे शाखेने वाहनचोरीविरोधात विशेष मोहीम राबवली होती. नवी मुंबईसह ठाणे, मुंबई आणि रायगड परिसरात दुचाकी व रिक्षा चोरीच्या तक्रारी वाढल्याने ही कारवाई करण्यात आली.

पहिल्या प्रकरणात गुन्हे शाखेने खारघर परिसरातून एका सराईत वाहनचोराला अटक केली. तो गॅरेजमध्ये काम करत असल्याचा अनुभव वापरून दुचाकी चोरी करत असे. वाहनांची ओळख नष्ट करून ती विकली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या कारवाईत १७ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, अनेक प्रलंबित गुन्हे उघडकीस आले आहेत.

दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी डोंबिवली व कल्याण परिसरातून चार जणांची टोळी अटक केली. ही टोळी नवी मुंबई व आसपासच्या जिल्ह्यांतून दुचाकी व रिक्षा चोरी करत होती. चोरी केलेल्या वाहनांवर बनावट नंबर प्लेट लावून ती विक्री केल्याचे तपासात उघड झाले आहे. या टोळीच्या अटकेमुळे २६ चोरीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.

या दोन्ही कारवायांमुळे नवी मुंबई व परिसरातील अनेक वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या काही वाहनांच्या मालकांचा शोध सुरू असून, वाहनचोरीच्या इतर टोळ्यांशी संबंध आहेत का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांनी नागरिकांना वाहन लॉक करून ठेवणे, सीसीटीव्हीचा वापर करणे आणि संशयास्पद हालचाली तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.