स्टोन क्रेशरच्या प्रदूषणाविरोधात सायले ग्रामस्थांचा ठराव; जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे

मुरबाड | प्रतिनिधी

मुरबाड–माळशेज मार्गावरील सायले गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या स्टोन क्रेशरमुळे होणाऱ्या प्रदूषणातून शेतजमीन व नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी सायले ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवित जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे घातले आहे. या स्टोन क्रेशरला कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये, असा ठराव २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला असून, जिल्हाधिकारी याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्टोन क्रेशरच्या कर्कश आवाजामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण होत असून, त्याचा थेट परिणाम शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच क्रेशरमधून उडणाऱ्या धुरळ्यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास, गंभीर आजार उद्भवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काही ठिकाणी या धुरळ्यामुळे जीवितहानी झाल्याचे अनुभवही समोर आले असल्याचा उल्लेख ग्रामस्थांनी केला आहे.

या धुरळ्याचा परिणाम शेतजमिनीवर होत असून, सुपीक जमीन नापीक बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिके घेणे अवघड होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मुरबाड तालुक्यातील कोलठण, माल्हेड, पवाळे, म्हाडस, बांधीवली, शिरगाव व गोर्‍याचा पाडा या भागांतील शेतकऱ्यांच्या जमिनी व जीवनमानावर स्टोन क्रेशरचा विपरीत परिणाम झाल्याचे उदाहरण ग्रामस्थांनी मांडले आहे.

या प्रकारांची पुनरावृत्ती सायले गावात होऊ नये, यासाठी प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांनी एकमताने स्टोन क्रेशरला तीव्र विरोध दर्शविला. तसेच क्रेशरमुळे परिसरात प्रदूषण वाढेल आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांवर नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येईल, अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे.

सायले ग्रामपंचायतीच्या सरपंच जागृती पानसरे यांनी सांगितले की, गावाच्या हितासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्टोन क्रेशरविरोधात ठराव मंजूर करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. तर ग्रामपंचायत अधिकारी अशोक बांगर यांनीही ग्रामसभेत घेतलेला हा ठराव जिल्हाधिकारी ठाणे यांना सादर करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.