शिंदे सेनेतील गटबाजीचा फटका; ऊर्मिला लाटे बॅनरबाजीतून गायब

मुरबाड | प्रतिनिधी

उबाठा शिवसेनेतून शिंदे गटात दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांना मुरबाड तालुक्यात गटबाजीचा फटका बसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये विशेषतः माजी उबाठा पदाधिकारी सौ. ऊर्मिला लाटे यांचे नाव पुढे येत असून, त्यांना अद्याप कोणतेही महत्त्वाचे पद न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

मुरबाड तालुक्यातील उबाठा शिवसेनेतील अनेक पदाधिकारी शिंदे सेनेत दाखल होऊन वर्ष उलटले आहे. काहींना सुरुवातीला बराच काळ ताटकळत ठेवण्यात आले, तर नंतर पदांची खिरापत वाटून कामाला लावण्यात आले. मात्र, पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या आणि शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या सौ. ऊर्मिला लाटे यांना अद्यापही पदापासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, त्यांची जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती होणे अपेक्षित होते. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना संधी मिळाली नाही, अशी चर्चा आहे. ही बाब शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा बॅनरमधूनही समोर आली आहे.

तालुक्यात ठिकठिकाणी लावलेल्या बॅनरवर अनेक पदाधिकाऱ्यांची नावे झळकली, मात्र सौ. ऊर्मिला लाटे यांचे नाव किंवा छायाचित्र कुठेही दिसून आले नाही. यामुळे “पदाशिवाय किंमत नाही का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शेवटी, पक्षप्रमुखांच्या वाढदिवसाच्या बॅनरबाजीतही गटबाजीचे ग्रहण लागल्याचे चित्र मुरबाड तालुक्यात स्पष्टपणे दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *