राजभाषा दिनानिमित्त महाविद्यालयात निबंध स्पर्धा
दीपक गायकवाड – मोखाडा
” पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका… मीच विनविते हात जोडून, वाट वाकडी धरू नका या काव्यपंक्तीतून समस्त भारतीयांना स्वातंत्र्य अबाधित राखण्याकरिता स्वातंत्र्यदेवीच्या कल्पनेतून विनंती करणारे मराठी भाषेतील थोर साहित्यिक कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्ताने गिरीवासी सेवा मंडळ, कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी वरिष्ठ महाविद्यालय आणि मातोश्री यशोदाबाई मुरलीधर मोहिते कनिष्ठ महाविद्यालय खोडाळा-जोगलवाडी या महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा विकास आणि त्यायोगे मराठीच्या प्रसारास चालना मिळावी या दृष्टिकोनातून महाविद्यालयातील मराठी वाङमय मंडळाच्या संकल्पनेतून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निबंध स्पर्धेकरिता ‘ मराठी भाषा संवर्धन : काळाची गरज’ हा विषय विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. निबंध स्पर्धेत बावीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उत्साह वाढवला. तसेच यानिमित्ताने काव्यवाचनासाठी स्वरचित किंवा संग्रहीत, संपादित काव्यांचे वाचन करण्याची मुभा देण्यात आली होती. काव्यवाचनास विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनाही मोह आवरता आला नाही.
मराठी भाषा कथा, कविता, कादंबरी, अभंग, भारुड आदी. साहित्यप्रकारातून समृद्ध झाल्याचे मत मराठी विभागाचे प्रमुख प्रा. नितेश कोरडा यांनी व्यक्त केले. तर कवीला व्यक्त होण्याचे प्रभावी साधन भाषा आहे असे प्रतिपादन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवर्तन काशीद यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.तुकाराम रोकडे व हिंदी विभाग प्रमुख प्रा. रघुनाथ मोरे यांनी मराठी भाषेचे महत्व विशद केले.
यावेळी गिरीवासी सेवा मंडळाचे खजिनदार भास्कर खोळंबे, उपप्राचार्य प्रा. यशवंत शिद, प्रा. मायूरी नागवंशी, प्रा. नरेश महाले, अश्विनी तायडे, प्रा. रमेश धोंडगा, प्रा. माधुरी अहिरे, प्रा. शुभम तुमडा आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
