दीपक गायकवाड – मोखाडा
मोखाडा तालुक्यातील पोऱ्याचा पाडा या दुर्गम आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळेतील चार विद्यार्थ्यांनी एमटीएस ऑलिम्पियाडच्या राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून परिसराचा बहूमान वाढवला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असतानाही या विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ही कामगिरी केली आहे.
राज्यभरातून हजारो विद्यार्थी सहभागी झालेल्या या स्पर्धेत पोऱ्याचा पाडा जिल्हा परिषद शाळेतील हिमांश हरिश्चंद्र शिंदे (इ १ली) राजेश नितीश झुगरे (इ २री) प्रदीप गोविंद झुगरे(इ ३री) व परी सतीश झुगरे (इ ४थी) या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सन २०२४-२०२५ मध्ये झालेल्या परुक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे मर्यादित शैक्षणिक साधने, इंटरनेटची अपुरी सुविधा आणि भौगोलिक अडचणींवर मात करून त्यांनी नियमित सराव, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या पाठबळावर हे यश मिळवले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. अतिरिक्त तास, सराव परीक्षा आणि वैयक्तिक लक्ष यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासाच्या जोरावर या स्पर्धेतील अतूलनीय यशानंतर गावात आनंदाचे वातावरण पसरले असून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. या यशामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी नवचैतन्य निर्माण झाले आहे. एकूणच “परिस्थिती नाही, तर जिद्द मोठी”असली की कोणतेही शिखर सर करता येते हे या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
पोऱ्याचा पाड्याच्या विद्यार्थ्यांच्या या यशामुळे मोखाडा तालुक्याचे नाव राज्यभर गाजत असून इतर विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत. या अतिदुर्गम पाड्यातील चिमुकल्यांना यशस्वी होण्यासाठी शिक्षकी सरिता ढेरे, सुलोचना दाते व शिक्षक विष्णू मोहंडकर यांनी परिश्रम घेतले आहेत.
