वाशिम (दि. 28 फेब्रुवारी): महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, पुरस्कार वितरण व पदाधिकारी सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून शेकडो पत्रकार, संपादक, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री दत्तात्रय भरणे होते, तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहउद्घाटक म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे सांगत सत्य, पारदर्शकता व निर्भीडपणा जपण्याचे आवाहन केले.






अधिवेशनात “पत्रकारांचा डीएनए काय?” या विषयावर चर्चासत्र पार पडले. डिजिटल युगातील आव्हाने, सोशल मीडियाचा प्रभाव, फेक न्यूजचा वाढता धोका आणि पत्रकारांची नैतिक जबाबदारी यावर सखोल चर्चा करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांनी मूल्यनिष्ठ पत्रकारिता करत संघटनात्मक एकजूट मजबूत करावी, असे प्रतिपादन केले. पत्रकारांच्या हक्क व सुरक्षेच्या प्रश्नांवर संघटना ठामपणे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी “उत्कृष्ट संघटक युवा चेतना पुरस्कार 2025-26” अंतर्गत राज्यातील विविध विभागांतील पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच संघटनेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
राज्यभरातील पत्रकारांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अधिवेशनाला भव्य स्वरूप प्राप्त झाले असून पत्रकारितेतील मूल्ये, एकजूट आणि संघटनात्मक बळकटी यांचा संदेश देत कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.



