शासकीय विश्रामगृह ते शिरसगाव रस्त्याला भगदाड

दीपक गायकवाड – मोखाडा

खोडाळा विश्रामगृह ते शिरसगाव मार्गावर विश्रामगृहा पासून पुढे शिरसगाव कडे दरम्यानच्या एक किलो मीटर अंतरावर रस्त्याला रस्त्या खालून मोठे भगदाड पडलेले आहे. तसेच या ठिकाणी बांधलेल्या मोरीचे पाईप उघडे पडले असून दोन्ही बाजूचे पाईप एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर तीव्र वळण आणि त्याच पटीत तीव्र उतार व चढाव असल्याने त्या ठिकाणी अपघात झाल्यास चालकाला वाहनाचा तोल सावरणे मुश्किल होणार आहे. पर्यायाने मोठी जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोखाडा यांनी या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याची गरज होती. परंतु सार्वजनिक बांधकाम उपविभाग आजही साखर झोपेत आहेत.

हा मार्ग जवळचा आणि वेळेत पोहोचवणारा असल्याने या मार्गाला येथून जाणाऱ्या व येणाऱ्यांनी पहिली पसंती दिलेली आहे. परंतु मोखाडा सार्वजनिक बांधकाम उपविभागाने या मार्गाकडे काडीमात्रही लक्ष दिलेले नाही त्यामुळे या मार्गाच्या दुरावस्थेत अधिकच भर पडत आलेली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले असून तीव्र वळणं आणि उतारावरून व घाटमाथ्यावरून वाहन चालवताना चालकांची दमछाक होत असून त्यांना अक्षरशः कसरत करत आपले वाहन हाकावे लागत आहे.

सार्वजनिक बांधकाम उपविभागाने मोखाडा तालुक्यात मागील आर्थिक वर्षात कोट्यावधी रुपयांची कामे केलेली आहेत परंतु शिरसगाव, आडोशी, पाथर्डी, कुर्लोद, बोटोशी , मानीपाडा, पेठेपाडा या अतिदुर्गम गावांना जोडणाऱ्या शिरसगाव ते शासकीय विश्रामगृह मार्गावर कमालीचे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे या रस्त्याची अधिकाधिक वाताहत झालेली आहे वास्तविकता हा मार्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येतो परंतु या मार्गावरील सर्वच कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली आहेत. मग आत्ताच या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोखाडा , मुग गिळून का गप्प बसलेले आहेत असा सवाल शिरसगाव ते पेठे पाडा पर्यंत चे नागरिक विचारित आहेत.
याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाशी संपर्क साधण्याचा आटोकाठ प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

तर जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाची संपर्क साधून विचारणा केली असता हा रस्ता आमच्याच अखत्यारीत आहे. परंतु त्यावरील सर्वच कामे सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोखाडा ने केली आहेत. त्यांनी जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविल्यामुळे मागील काही वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोखाडा यांनीच या रस्त्यावर कामे केलेली आहेत. सध्या तरी आमचा या मार्गाशी अर्थात काहीही संबंध नाही‌.

इरफान खान पठाण
कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मोखाडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *