चिंचोली येथे भव्य शेतकरी मेळावा व नागरी सत्कार संपन्न

जुन्नर, दि. २४ मार्च २०२६ : जुन्नर तालुक्यातील चिंचोली (काशिद) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कृषी विभाग, जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला.
यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आल्याबद्दल पंचायत समिती सभापती सौ. कमलाताई शेळकंदे, उपसभापती अमितराव ढोले व जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
मेळाव्यात कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथील शास्त्रज्ञ वैभव शिंदे यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन व उत्पादनवाढ याबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः आंबा लागवड तंत्रज्ञान व संबंधित समस्यांवर सविस्तर माहिती दिली.
चिंचोली ग्रामपंचायतीने अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवून तालुक्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामध्ये क्यूआर कोडद्वारे प्रत्येक घराला नेमप्लेट, घरपट्टी व पाणीपट्टीची ऑनलाइन वसुली (तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत), जलसंधारण, वृक्षलागवड, सुशासनयुक्त पंचायत, बालस्नेही पंचायत, महिला उपजीविका विकास व लोकसहभागातून ग्रामविकास या क्षेत्रांत उल्लेखनीय काम झाले.
‘राह फाउंडेशन’च्या माध्यमातून पाझर तलाव व माती नाला बांधाच्या खोलीकरण व मजबुतीकरणाची कामे सुरू असल्याची माहिती सरपंच खंडू काशिद यांनी दिली.
कार्यक्रमात सभापती कमलाताई शेळकंदे यांनी गावाच्या विकासासाठी सहकार्याचे आश्वासन दिले. उपसभापती अमितराव ढोले यांनी शेतीविषयक प्रश्न सोडवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली, तर जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव पारखे यांनी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी सहकार्याची ग्वाही दिली.
मेळाव्यास परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पद्धती अवलंबण्याचा निर्धार व्यक्त केला.
सदर मेळाव्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष चव्हाण, माजी संचालक उत्तमराव काशिद श्री समर्थ मराठा समाज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ काशिद, वडज गाव सरपंच सुनिल चव्हाण, चिंचोलीचे उपसरपंच इम्रान चौगुले, ग्रामपंचायत सदस्या फसाबाई वाजे, पोलिस मित्र नवनाथ ताजणे, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावर, सहाय्यक गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर, कृषी अधिकारी डी. पी. रावते व विस्तार अधिकारी लक्ष्मण झांजे यांचे मार्गदर्शन लाभले. शेवटी ग्रामपंचायत अधिकारी सौ. अर्चनाताई केदारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
चिंचोली ग्रामपंचायतने डिजिटल सुशासन व विकास कामांतून इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. शेतकऱ्यांसाठी असे मेळावे नियमित होत राहिले तर गावाचा विकास अधिक गतिमान होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *