पाण्यासाठी सायदे ग्रामस्थांचा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

मजीप्राने ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसली
आश्वासन देऊनही त्याची पुर्तता केली नाही
सायदे आणि बारा पाड्यात तीव्र पाणीटंचाई

दीपक गायकवाड – मोखाडा

सायदे जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.त्यामूळे दि 27 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि शेकडो ग्रामस्थांनी थेट पाण्याच्या टाकी जवळ एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते.तत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जलजीवन मिशनचे ठेकेदार आणि अधिकारी यांनी दि 31 मार्च अखेरपर्यंत नळपाणी पुरवठा योजना सुरू करण्याचे लेखी आश्वासन देऊन वेळ मारून नेली होती.परंतु त्याउप्परही प्रस्तूत ग्रामपंचायत हद्दीत कोणतेही काम न केल्याने येथील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.परिणामस्वरुप येथील ग्रामपंचायत प्रशासनाने दि 9 एप्रिल पासून थेट जलकुंभाजवळ बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सायदे महसूल ग्रामपंचायत हद्दीतील मौजे वाघ्याची वाडी, सावरपाडा, हट्टीपाडा, अंधेरवाडी, हुंड्याची वाडी, बादलपाडा, खडकवाडी, मारुतीचीवाडी, बोरीचीवाडी, जांभूळवाडी इत्यादी 12 गाव पाड्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे येथे तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी यासाठी सायदे आणि बारा गाव पाड्यातील ग्रामस्थांनी थेट जलजीवन मिशन च्या टाकीजवळ माहे फेब्रुवारी महिन्यात धरणे आंदोलन केले होते. यावेळी पाण्याची व्यवस्था करा अन्यथा धरणे आंदोलन तीव्र करू असा एकच सूर येथील ग्रामस्थांनी लावला होता. त्यापुढे जलजीवन मिशनचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी नमते घेऊन 31 मार्च पर्यंत काम चालू करण्याचे आश्वासन दिले होते.त्यामुळे तूर्तास हे धरणे आंदोलन रहित करण्यात आले होते.तथापी 31 मार्च उलटूनही आजपर्यंत कोणतेही पाणीपुरवठ्याचे काम न झाल्याने सायदे जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी दि 9 एप्रिल पासून सनदशिरपणे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

मोखाडा तालुक्यात सर्वत्र शेकडो कोटीची जलजीवन मिशनची कामे करण्यात आलेली आहेत. यातील काही ठिकाणी हर घर नल योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. तर काही ठिकाणी नुसत्याच टाक्या उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळे टाकीत पाणी दिसत असले तरी ग्रामस्थांना त्याचा उपभोग घेता येत नाही. व येथून पाण्यासाठी बसवलेल्या व्हाल्व्ह मधून तहानलेल्या ग्रामस्थांनी परस्पर पाणी उपसा केला तर अशा ग्रामस्थांवर पोलीस तक्रार दाखल करण्याचे धमकी संबंधितांकडून दिली जात आहे.तसेच या ठिकाणी जलजीवन मिशनचे काम झाले असल्यामुळे टँकर द्वारे पाणीपुरवठाही केला जात नाही त्यामुळे येथील ग्रामस्थांची “आई जेवू घालीना, तर बाप भीक मागू देईना” अशी अवस्था झालेली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही होणे अपेक्षित आहे.अन्यथा जलजीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

♠️अखेर पाणी पेटणार….!♠️

ज्यांच्यासाठी या योजनेचा घाट घातला आहे तेच आज चातकासारखे तहानलेले राहिलेले आहेत. एकीकडे शासन निरनिराळ्या योजना काढून त्यासाठी निधीची तरतूद करीत आहे परंतु पाण्यासारख्या अत्यावश्यक बाबतीत मात्र कमालीची दिरंगाई होत आहे.त्यातचदि 27 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता झाली नसल्याने आत्ता येथील पाणी पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

निधीची अडचण ही शासनाने कोणत्याही मार्गाने पुरी करावी.दि.27 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने आम्हाला नाविलाजासतव आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत आहे.आम्हाला आमचे हक्काचे पाणी दिलेच पाहिजे.अन्यथा अधिक तीव्रतेने आंदोलन करावे लागेल.
श्रीमती सिंधू संजय झुगरे
सरपंच
ग्रामपंचायत सायदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *