भोपाळ (प्रतिनिधी) – मध्यप्रदेश राज्याच्या राज्यपाल श्री मंगुभाई पटेल यांची भोपाळ येथील राजभवनात दैनिक समर्थ गांवकरी व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रतिनिधीमंडळाने सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पत्रकारिता क्षेत्रातील बदलते स्वरूप, ग्रामीण भागातील पत्रकारितेची आव्हाने, सामाजिक प्रश्न आणि लोकहिताच्या विविध विषयांवर सखोल व सकारात्मक चर्चा झाली.

प्रतिनिधी मंडळाने राज्यपालांना संघटनेच्या कार्याची माहिती देत पत्रकारांच्या हक्कांबाबत, डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावाबाबत तसेच समाजहिताच्या उपक्रमांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी पत्रकारितेची जबाबदारी अधोरेखित करत समाजाच्या जडणघडणीत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी राज्यपालांना गीता सार ही पुस्तिका भेट देऊन भारतीय संस्कृती व मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश दिला.
तसेच, अखिल भारतीय गुजरात समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संजय पटेल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव उपस्थितांनी केला.
या भेटीला दैनिक समर्थ गांवकरीचे समूह संपादक शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर (ठाणावाला), राम जानकी मंदिराचे पीठाधीश्वर जगनजेय महाराज,
जबलपूर येथील नामांकित विधी तज्ञ अॅड अरुण भाई चौधरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात आदरयुक्त व सकारात्मक वातावरण होते.
ही भेट पत्रकार संघाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली असून भविष्यातही अशा संवादातून समाजहिताचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास प्रतिनिधींनी व्यक्त केला.
