मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या मार्फतनवापूर समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान संपन्न

पालघर, दि. २९ सप्टेंबर : नवापूर समुद्रकिनारा स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पालघर तसेच टाटा स्टील कंपनी, बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत नवापूरच्या सहकार्याने विशेष समुद्रकिनारा स्वच्छता अभियान मोहिम राबविण्यात आली.

या उपक्रमात किनाऱ्यावर साचलेला प्लास्टिक व घनकचरा गोळा करून त्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम करण्यात आले. तसेच “स्वच्छ किनारा – निरोगी पर्यावरण” हा संदेश देत स्थानिक ग्रामस्थांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली.

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
अभियानात स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. समुद्रातील जैवविविधतेचे रक्षण आणि आरोग्यदायी वातावरण राखण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही देण्यात आले.

या अभियानास नवापूर सरपंच अंजली बारी, उपसरपंच खगेश पागधरे ,ग्रामविकास अधिकारी राजेश संखे, समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) हरीश जाधव, प्रल्हाद पगधरे ग्रामपंचायत सदस्य, टाटा स्टील कंपनीचे प्रतिनिधी, तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व स्वयंसेवी कार्यकर्ते उपस्थित होते.

गोळा करण्यात आलेला कचरा स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतीच्या मदतीने योग्य पद्धतीने नष्ट करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्वच्छ किनाऱ्यामुळे पर्यटनाला चालना

या स्वच्छता उपक्रमामुळे नवापूर समुद्रकिनाऱ्याचे पर्यावरणीय संतुलन राखले जाणार असून स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल. तसेच ग्रामस्थांच्या आरोग्य सुधारण्यातही याचा मोठा हातभार लागणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.