पालघर, दि. ३ ऑक्टोबर : पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात मागील काळात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व घरांच्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व नागरिकांना दिलासा दिला.




डहाणू तालुक्यातील मौजे जामशेत येथे पद्माकर रामचंद्र उमतोल यांच्या ३ एकर भात पिकाचे, स्नेहल आनंत पोतदार यांच्या १२ एक्कर चिकू पिकाचे, तर गुंगवाडा येथील तुलशीदास रामचंद्र बारी यांच्या ०.८० एकर भात पिकाचे मोठे नुकसान असून यांची पाहणी जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी केली. तसेच बाडापोखरण व गुंगवाडा येथील शेतकरी तसेच सरावली येथील ५ नुकसानग्रस्त घरांना भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. बाबू महादू माच्छी यांच्या २.५ एकर भात पिकाचे नुकसानही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिले. याशिवाय श्री. रडका शीतल झिरवा, विजय गणेश यादव, नितीन शेख, इस्माईल शेख, बच्चू राजक, कमलेश माच्छी, पुजा माच्छी व कलावती तांडेल या नागरिकांशी संवाद साधून शासनाकडून तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले. यावेळी तहसिलदार सुनिल कोळी, गटविकास अधिकारी श्रीमती पल्लवी सस्ते व तालुका कृषी अधिकारी अनिल नरगुलवार उपस्थित होते.
तलासरी तालुक्यातील वडवली-ओझरपाडा परिसरात अतिवृष्टीमुळे वारोळी नदीला पूर आल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पुरग्रस्त घरे व शेतीची पाहणी करून स्थानिक महिला व शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी अपदग्रस्तांना शासनाची मदत तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. या वेळी तहसिलदार अमोल पाठक, गटविकास अधिकारी वैभव आफळे, तालुका कृषी अधिकारी रघू इभाड, माजी उपसभापती नंदू हाडळ, सरपंच प्रमोद ओझरे तसेच नागरिक उपस्थित होते.

