ग्रामीण आदिवासी भागात आठ टॉवर पण, ग्राहकांच्या हातात गाजर

मोखाड्यात बी एस् एन् एल दुरध्वनी सेवेचा लपंडाव सुरुच ….!

नो नेटवर्कने ग्राहक हैराण

दीपक गायकवाड – मोखाडा

खोडाळा आणि परिसरात नो नेटवर्कने ग्रामीण आदिवासी पट्ट्यातील ग्राहकवर्ग अतिशय बेजार झाला होता. बीएस्एनएलच्या नन्नाच्या पाढ्याला अक्षरशः कंटाळुन येथील ग्राहकवर्ग केवळ नाविलाजास्तव खाजगी सेवेकडे वळला होता.ही बाब लक्षात घेऊन अखेर बी एस् एन् एल् ने मौजे सायदे, कोचाळे, सूर्यमाळ, सावर्डे, करोळ, कारेगाव, काष्टी, आमला या ८ ठिकाणी बी एस् एन् एल् चे टॉवर उभे केले असल्याचा सार्वजनिक उहापोह करत बी एस् एन् एल् चे मुळ ग्राहक पुन्हा बी एस् एन् एल् कडे आकृष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता.परंतु त्याउपरांतही दुरध्वनी सेवेत काडीमात्रही बदल झालेला नाही.या एकंदरीत घडामोडी नंतरही ईप्सित साध्य न झाल्याने बी एस् एन् एल् ने फक्त गाजरच हाती दिल्याची तीव्र लोकभावना ऐकायला मिळत आहे.

तंत्रज्ञानाच्या युगात आज सर्व काही सोपे आणि सुरळीत झाले असून त्यासाठी इंटरनेट सेवा अत्यावश्यक बनलेली आहे. मात्र हीच भारत संचार निगम ची नेटवर्क सेवा सातत्याने कोमात जात असल्याने असंख्य ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे.वारंवार कळवूनही बी एस एन एल सेवेत तीळमात्रही सुधारणा झालेली नाही.परंतू मोठ्या पाठबळ व्यवस्थेचे धनी असूनही सेवेत आमूलाग्र बदल संभवला नाही‌.हे खेदजनक असतांनाही बी एस एन एल सेवेने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून ग्राहकांना सुलभ सेवेपासून अनियमित काळ वंचित ठेवले आहे.त्यामूळे बी एस् एन् एल सेवेच्या ग्राहकांना विकतचा मनस्ताप होत आहे.

मागील 2 वर्षा पासून बी एस एन एल चे नेटवर्क प्रदीर्घ काळ गायब होत आहे. त्यामुळे त्याच्या वर अवलंबून असलेल्या सर्व सोयीसुविधांचा अक्षरशः बट्ट्याबोळ उडालेला असल्यामुळे ग्राहकांना त्याचा त्रास होत आहे.भारत संचार निगमने ग्राहकांसाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. अखंडीत व मजबूत सेवा देण्यासाठी आपली पकड मजबूत करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे बहुसंख्य ग्राहकवर्ग बी एस एन एल कडे आकर्षित झाला आहे.मात्र असे असले तरीही नेटवर्कच अनियमित काळ बेपत्ता होत असल्याने बी एस एन एल चे सर्वच दावे हे फुसका बार ठरत असून ग्रामीण पटटयातील ग्राहकांची त्यामुळे फारच कुचंबणा होत आहे.

भारत संचार निगम ही देशातील एक अग्रगण्य अशी दूरसंचार सेवा असून उत्कृष्ट सेवेसाठी परिचीत आहे.तसेच या सेवेची व्याप्ती मोठी आहे.तथापी वारंवार सेवा खंडीत होणे, सलग 15-15 दिवस नेटवर्क गायब होणे यामूळे बी एस एन एल ची उत्कृष्ट सेवेची ओळख पुसट होत चालली आहे.सेवेतील विस्कळीत पणा बाबत सातत्याने वरिष्ठांकडे तक्रारी करुन देखील सुरळीत व अखंड सेवा देण्यासाठी भारत संचारकडून काडीमात्र प्रयत्न केले जात नाहीत. पर्यायाने प्रसंगी शासकिय कार्यालयांना इतर सेवा जवळ कराव्या लागत आहेत तर शेकडो बी एस एन एल च्या मोबाईल सेवा धारकांनी तर या सेवेकडे सपशेल पाठ फिरवली आहे.

पालघर सारख्या दुर्गम व डोंगराळ भूप्रदेश असलेल्या जिल्ह्यात भारत संचार निगम च्या सेवेची नितांत गरज असतांनाही तशी ती अखंड व निर्वेध सुरु ठेवण्यासाठी कंपनी कडून कुठलीही उपाययोजना केली जात नाही. भारत सरकारच्या उदारीकरणाच्या धोरणा नंतर देशात खाजगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी आपली मोबाईल सेवा चालू केली असून चांगले बस्तान बसवले आहे.

एकीकडे सुरळीत खाजगी सेवा आणि असंख्य ग्राहकवर्ग तर दुसरीकडे बी एस एन एल ची सेवा सुरळीत करण्यासाठी कुठलीही उपाययोजना राबविली जात नाही. त्यामूळे भारत संचार निगम ही अप्रत्यक्षपणे जिओ, एअरटेल, व्होडाफोन या सारख्या बड्या कंपन्यांना त्यांचा विस्तार करण्यास हातभार लावत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

“इतर सेवांच्या तुलनेत बी एस एन एल परवडेबल असली तरी,199 च्या मासिक रिचार्ज मध्ये 15 दिवस सलग सुरळीत सेवा मिळत नाही.त्यामूळे सारखेच पडते.पर्यायी मी आजच माझी बी एस एन एल चे सिमकार्ड एअरटेल मध्ये पोर्ट आऊट केले आहे.”

शाकीर हैदर शेख
बी एस एन एल उपभोक्ता
खोडाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *