जव्हार प्रतिनिधी:
जिल्हा परिषद पालघर, पंचायत समिती जव्हार शिक्षण विभाग आणि सेसमी वर्कशॉप इंडिया ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२५ निमित्ताने अभिजात मराठी भाषा साहित्य संमेलन हा मराठी संस्कृतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.हा साहित्यिक सोहळा भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार येथे पार पडला. संमेलनाचे अध्यक्षपद व उद्घाटक सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी व साहित्यिक मा. अरुण म्हात्रे यांनी भूषविले, तर स्वागताध्यक्षा म्हणून गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे उपस्थित होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य रोहन चुंबळे (औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार), प्रकाश चुंबळे (माजी अध्यक्ष राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय, जव्हार), पुंडलिक चौधरी, ईश्वर पाटील, महाले सर, मनीषा डांगे, सखाराम पवार (शिक्षक संघटना प्रतिनिधी) तसेच मनोज कामडी (तालुका व्यवस्थापक, पेसा) इतर मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला शोभा आली.

सकाळी कार्यक्रमाची सुरुवात भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनियर कॉलेज, जव्हार येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात काढलेल्या ग्रंथदिंडी मिरवणुकीने झाली. मराठी भाषेचा गौरव आणि अभिमान ग्रंथदिंडीच्या स्वरूपात व्यक्त झाला.उद्घाटन सत्रात विस्तार अधिकारी ईश्वर पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर ज्ञानेश्वर राठोड यांनी “अभिजात मराठी भाषा” या विषयावर प्रेरणादायी प्रवचन दिले.यानंतर कथालेखन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. बाल कवी कट्टा आणि शिक्षक कवी कट्टा या सत्रांनी संमेलन रंगतदार बनवले. शिक्षक कवी कट्ट्यात मधुकर भोये, महेश भोये, प्रकाश वाघ, अरुण राठोड, लोकनाथ जाधव, ज्ञानेश्वर राठोड, राजू महाला, छाया शेटे, किशोर डोके, संतोष गोविंद आदी कवींनी सहभाग घेतला.दुपारच्या सत्रात निमंत्रित कवी संमेलन जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यात विजया टाळकुटे, वैभव वऱ्हाडी, जितेंद्र लाड, वैभव भानुशाली, विजय जाधव या मान्यवर कवींनी आपल्या प्रभावी कवितांद्वारे मराठी कवितेचा जल्लोष साकारला.संमेलनात शैक्षणिक दालने आणि पुस्तक प्रदर्शन यांनाही शिक्षक व विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना मुकणे व रुपेश तायडे व रवी बुधर सर यांनी उत्कृष्टरीत्या केले.संमेलनाचा समारोप संमेलनाध्यक्ष कवी अरुण म्हात्रे यांनी सुरेश भट यांच्या “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” या गीताच्या प्रभावी गायनाने झाला. योगेश डोलनर यांनी आभार प्रदर्शन केले.या साहित्य संमेलनातून मराठी भाषेची अभिजातता, सृजनशीलता आणि संस्कृतीचा गौरव उजळून निघाला.
