पालघर लोकसभेचे खासदार डॉ हेमंत सवरा पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

दीपक गायकवाड – मोखाडा

पालघर जिल्ह्यामध्ये दिनांक 25,26,27 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची हाती आलेली पिके भुईसपाट केलेली आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी पालघर लोकसभेचे खासदार डॉ.हेमंत सवरा हे मोखाडा तालुक्यात येऊन प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी त्यांनी केली ली आहे.यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा खासदारांसमोर मांडली. व सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी खासदार सवरा यांच्याकडे केली आहे.

मोखाडा तालुक्यात 2015.76 हेक्टर क्षेत्र हे भात पिकाखाली आहे. तर 3327.97 हेक्टर क्षेत्र नागली पिकाखाली आहे. व 3886 हेक्टर क्षेत्र वरई पिकाखाली आहे. असे एकूण 9229.73 क्षेत्र हे उपजीविका आणि उत्पन्नाच्या पिकाखाली आहे. यातील 2015.76 हेक्टर भात पिकांच्या क्षेत्रापैकी निमगरवे आणि हळव्या भात पिकांचे या आगंतुक तुंबळ अवकाळीने अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच अजूनही पुढील चार-पाच दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्याने यातील शिल्लक पिकांचेही नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. मोखाडा तालुक्यातील एकूणच शेतकरी हा हंगामी पिकावर अवलंबून आहे त्यातच पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे. आता जवळजवळ उपजीविकेचे पीक हे हातातून गेलेले आहे.शिल्लक राहिलेले उत्पन्नाचे पीकही हातातून गेल्यास शेतकऱ्यांनी शेतीसाठी खाजगी सावकाराकडून उचललेला वरकड पैसा भागवण्याची वेगळीच डोकेदुखी शेतकऱ्यांना भेडसावणार आहे. शासनाने यापूर्वी झालेल्या नुकसानी पोटी 12 कोटी 40 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. तथापि सदरची मदत अतिशय तुटपुंजी असल्याने शासनाने वास्तविक परिस्थितीचा विचार करून योग्य त्या प्रमाणात नुकसान भरपाई उपलब्ध करून देण्याची मागणी आपल्या माध्यमातून सरकार दरबारी करण्याची विनंती खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या कडे तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदविली आहे.

पालघर जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान केलेले आहे‌. त्याचा सर्वाधिक फटका वरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या मोखाड्यातील शेतीला बसलेला आहे शेतात कापणीला आलेले तसेच कापून शेतातच गंज मारून ठेवलेले भात पीक पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे त्याला आता नव्याने मोड फुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे तर सध्या शेतामध्ये उभे असलेले गरवे भात पीक कापणीच्या कालावधी पलीकडे गेलेले आहे अतिवृष्टीमुळे भात पिकावर बगळ्या,खोडकिडा आदी रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता मुलतः घटलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वाजवी प्रमाणात नुकसान भरपाई मिळणे ही काळाची गरज आहे अन्यथा या भागातील शेतकऱ्यांनाही वरकड उचलीपोटी खाजगी सावकाराला तोंड लपवित फिरावे लागणार आहे.

बॉक्स…..

मोखाडा तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या एकूणच शेतीचे सरसकट तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, बाधित शेतकरी व आपत्तीग्रस्त नागरिकांना त्वरित भरघोस आर्थिक मदत पुरवावी व आपत्ती व्यवस्थापन निधीचा वापर करून मदत कार्य अधिक जलद गतीने सुरू करण्यात यावे ही मागणी मी अवकाळी च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रहीपणे नोंदवली आहे.

डॉ. हेमंत विष्णू सवरा
खासदार, पालघर लोकसभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.