पालघर – छ. संभाजीनगर बसचा देवगांव फाट्यानजीक अपघात

3 गंभीर तर 20 हून अधिक किरकोळ जखमी

सुदैवाने जीवितहानी टाळली

दीपक गायकवाड – मोखाडा

पालघर व्हाया वाडा खोडाळा मार्गे छ. संभाजी महाराजनगर बस क्रमांक एम.एच ०६, ९५७० श्रीघाट ते देवगांव दरम्यान देवगांव फाट्यानजीक वळणार अपघात झाला. यामध्ये तीन जण गंभीर तर पाच किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असून काही जखमींनी खाजगी दवाखान्यात उपचार घेणे पसंत केले आहे.यातील शाहनुरुबी खान (60) यांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना अपघात स्थळावरुनच अधिक उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात आली आहे.

पालघर आगाराची पालघरमधून 7 वाजता सुटणारी पालघर – वाडा – छ. संभाजीनगर बस (एम.एच 06, 9570)ही खोडाळा मार्गे नाशिककडे मार्गक्रमण करत असताना श्रीघाट ते देवगांवच्या दरम्यान देवगांव फाट्याच्या अलीकडील वळणार चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला साईडपट्टी सोडून बऱ्याच अंतरावर जाऊन कोसळली आहे.यामध्ये शिवराम झुगरे यांच्या नाकातोंडातुन रक्तस्त्राव सुरू असल्याने त्यांना खोडाळा येथे हलविण्यात आले. तर चंद्रकांत शिद यांना बरगडीला मार लागून जखमी झाले असून नसीमा शेख(26, बुलढाणा) सूरज देहाडे(42,आव्हाटे) सोनाली देहाडे (30,आव्हाटे) अपेक्षा देहाडे(17,आव्हाटे) कल्याणी देहाडे (14,आव्हाटे) दिव्याक्षी देहाडे (12, आव्हाटे) सिद्धार्थ देहाडे (09, आव्हाटे) सीता खाडगीर (33, खोडाळा) जानकी मानकरी (60, आडोशी) बेबी पारधी(60, पळसपाडा) बुधी पारधी (65,पळसपाडा) रुपाली बरफ (13,रायपाडा) ह्यातील थेट पालघरहुन नाशिककडे प्रवास करणाऱ्या शाहनूरुबी यांचा हात मोडल्याने त्यांना अधिक उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात आली आहे.

बसमध्ये एकूण ३८ प्रवासी प्रवास करत होते. रस्ता खराब असल्यामुळे चढ्याच्या वळणावर चालकाकडून गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला पडली. यामध्ये किरकोळ प्रवाशांना जखमा झाल्या असून वाहक व चालक सुरक्षित आहेत. मात्र, अपघातानंतर चालक भ्रमणध्वनीवरून बोलत असल्याचे अपघात ग्रस्तांमधून ऐकायला मिळाले आहे.

वेगावर नियंत्रण हवे…

पालघर आगाराच्या बस नाशिककडे मार्गक्रमण करत असताना सुसाट वेगाने धावत असतात. सुर्यमाळ, खोडाळा, श्रीघाट आणि देवगांव परिसर डोंगराळ असून नागमोडी वाळणाचा आहे. परिणामी, चालकांनी धोकादायक वळणाचा अंदाज घेऊन वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

✓ खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर

श्रीघाट ते देवगांव तीन किमी रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालवताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. गेल्या सात ते आठ वर्षापासून रस्त्याची दुरवस्था झाली असून आजपर्यंत अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत. त्यामुळे परिवहन सेवेच्या बस चालकांनी रस्त्याचा व खड्ड्यांचा अंदाज घेऊनच सुरक्षित प्रवास करण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेने केली आहे. या अपघातामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.