डहाणू मध्ये पोलिसाकडून महिलेवर अत्याचार ; कासा पोलीस ठाण्यातील घटना

कासा पोलीस ठाणे


कुणाल लाडे-पालघर
डहाणू

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्यातील एका हवालदाराने चौकशी साठी बोलावलेल्या महिलेशी जवळीक साधून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हवालदार याला ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे पोलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली असून पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीतील एका महिलेने २५ ऑक्टोबर रोजी पती आपल्याला सोडून डहाणू नजिकच्या गावातील एका तरुण मुलीसोबत राहत असल्याची तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने कासा पोलीस ठाण्यातील हवालदार शरद भोगाडे (वय ४१) यांनी डहाणू येथील तरुणीला (वय २१) चौकशी साठी बोलावले होते. अनेक वेळा चौकशीच्या निमित्ताने तरुणीला बोलावून हवालदार भोगाडे यांनी तरुणीशी जवळीक साधली. यानंतर २९ नोव्हेंबर रोजी भोगाडे यांनी तरुणीला चौकशी साठी बोलावले होते. यावेळी तरुणीला विश्वासात घेत भोगाडे यांनी पोलिस ठाण्याच्या मागील पोलिस वसाहतीतील एका खोलीत नेऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार तरुणीने केली आहे.

त्यानंतर पीडित तरुणीने ७ डिसेंबर रोजी डहाणू पोलिस ठाण्यात तक्रार करत पोलिस हवालदार भोगाडे यांनी तिची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार केली. तरुणीच्या तक्रारीवरून डहाणू पोलिसांनी गुन्हा दाखल करत कासा पोलिसांकडे वर्ग केला. यानंतर आरोपी भोगाडे यांना रविवार ७ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पोलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली असून या गंभीर प्रकाराची दखल घेत पालघर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अविनाश मांदळे यांची तडकाफडकी पोलिस मुख्यालयात बदली केली असून कासा पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक अमर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कासा पोलीस ठाण्यातील या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांकडूनच महिलांवर अत्याचार होत असल्यास दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या प्रकरणी आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक पातळीवरून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *