दिनांक ०४ जून २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम यांनी ग्रामपंचायत अरक येथील जिल्हा परिषद शाळेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी तहसीलदार, मंगरूळपीर यांना तातडीने आदेश दिले होते. याची प्रत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र, एक वर्ष उलटूनही या अतिक्रमणावर कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे.
दरम्यान, दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रारदाराने तहसीलदार आणि बीडीओ यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी ठोस उत्तर न देता निवडणुकांचे कारण पुढे केले. त्यामुळे, प्रशासनाची उदासीनता आणि दुर्लक्ष स्पष्ट होत असल्याचा आरोप समोर आला आहे.

तक्रारदाराने यावेळी आपल्या जीवाला गंभीर धोका असल्याचे लिहून दिले आहे. अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या असून त्याचे रेकॉर्डिंगही त्यांच्या जवळ आहे. याआधीही काही व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला, खोटे गुन्हे, आणि गंभीर आरोप लावण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे. म्हणून, भविष्यातही धोका कायम असल्याचे ते सांगतात.




तक्रारदाराचे म्हणणे आहे की त्यांच्या जीवाला काही नुकसान झाल्यास अतिक्रमण करणारे नागरिक, ग्रामपंचायतमधील जबाबदार सदस्य, संबंधित अधिकारी आणि प्रशासन हे पूर्णपणे जबाबदार राहतील.




गावकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे—
शाळेवरील अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी
- मुलांसाठी मैदान/गार्डन, किंवा
- श्री गजानन महाराज मंदिराचे बांधकाम
करण्यात यावे. तक्रारदाराने गावात परत येताना त्यांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचीही विनंती केली आहे.
