पालघर/घोलवड:
कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस खात्यालाच काळीमा फासणारी घटना पालघर जिल्ह्यातील घोलवड येथे उघडकीस आली आहे. घोलवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक साहेबराव शिवाजी कचरे यांच्यावर ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पालघर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), ठाणे यांच्याकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या नातेवाईकावर घोलवड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात संबंधिताला अटक न करण्यासाठी आणि गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी पोलीस निरीक्षक साहेबराव कचरे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
पडताळणीत सत्य आले समोर
या प्रकरणी तक्रारदाराने ९ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत एसीबीच्या पथकाने शासकीय पंचांच्या उपस्थितीत थेट घोलवड पोलीस ठाण्यातील निरीक्षकांच्या कक्षातच पडताळणी मोहीम राबवली. या पडताळणी दरम्यान साहेबराव कचरे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रक्षकच बनले भक्षक?
सामान्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावरच लाचखोरीचा आरोप सिद्ध झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘रक्षकच भक्षक’ झाल्याची चर्चा आता जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू असून , तपासांती आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे . संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या प्रकरणातील पुढील कारवाईकडे लागले आहे .
रक्षकच बनले भक्षक?
