दिपक साळुंखे – वाडा
वाडा तालुक्यातील कांबारे ते वासिंद हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू होती. मात्र, या मार्गावरील सावरोली गावाजवळील तानसा नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असल्याने प्रशासनाने या रस्त्यावरून अवजड वाहनांना सक्तीने बंदी घातली आहे.
सदर पुलाचे अधीक्षक अभियंता, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. या तपासणीत पुलाची अवस्था कमकुवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुलावरून अवजड वाहतूक सुरू राहिल्यास अपघाताची गंभीर शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे कांबारे-वासिंद मार्गावरून मालवाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रेलर तसेच इतर अवजड वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. परिणामी वाहतूकदारांचा वेळ व इंधन खर्च वाढणार असून वाहन मालक व वाहतूकदारांचे काही प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले असून, पुलाच्या दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीबाबतची पुढील कार्यवाही लवकरच हाती घेतली जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत. तोपर्यंत अवजड वाहनांनी या मार्गाचा वापर टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कांबारे-वासिंद रस्ता धोकादायक पुलामुळे अवजड वाहनांसाठी बंद
