सिमेंटच्या बंधाऱ्याच पाणी अडविण्यास प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर

वाडा – वाडा तालुक्यात अनेक नद्यांचे जाळे असून शेकडोंच्या संख्येने ओहोळांचे जाळे आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मात्र तालुक्यात भीषण टंचाईची समस्या उद्भवणार असून लोकप्रतिनिधी व सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी निधीची केवळ लयलूट केल्याचे पाहायला मिळत आहे. पाण्याचा पुरेसा साठा व्हावा म्हणुन पाणी आडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून गावागावात सिमेंट बंधारे उभारण्यात आले असून अनेक बंधारे बंद न केल्याने पाणी वाया जात असल्याने अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
वाडा तालुक्यातून पिंजाळ, वैतरणा, तानसा, गारगाई व देहजें या नद्या वाहत असून या नद्यांना जागोजागी काँक्रीटचे बंधारे उभारण्यात आले आहेत. गाव पातळीवर अनेक ओहोळ नद्यांशी जोडलेले असून या ओहोळांवर जागोजागी सिमेंट बंधारे बघायला मिळतात. १० लाखांपासून २५ ते ३० लाख तर अनेकदा त्याहून मोठे बंधार बांधण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून त्या अंतर्गत तालुक्यात सध्या पाणी आडवा, पाणी जिरवा संकल्पनेतून वनराई बंधारे बांधायचे काम सुरू आहे. सिमेंट गोण्यांमध्ये माती भरून पाणी अडविणे असे त्याचे स्वरूप असून अनेकदा जितक्या मातीच्या गोणी नाहीत त्याहून जास्त फोटो आणि सेल्फी काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात मंडळी व्यस्त असल्याचे बघायला मिळते. महत्वाचे बंधारे मात्र बंद करून पाणी अडविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे बघायला मिळत असून आपण सुजलाम सुफलाम होणार कसे असा प्रश्न लोकांना पडला आहे.

निधीचे बंधारे दरवर्षी विविध विभागांकडून बांधले जात असून लघु पाटबंधारे व वनविभाग यात अग्रेसर आहेत. सबंधित विभाग बंधाऱ्यांची जागा ठरवून त्याची निविदा काढतात मात्र यात गौडबंगाल करून मर्जीतील कंत्राटदार अनेकदा ही कामे आपल्या पदरात पाडून घेतात.
महाराष्ट्र शासनाचा वन विभागाचीही बंधाऱ्यांची कामे तर ऑनलाइन निविदा टाळण्यासाठी मुद्दाम १० लाखांच्या आत बसवून जात असून ठरलेल्या ठेकेदारांना ती वाटून दिली जातात. थातूरमातूर कामे करून ठेकेदार निधी हडप करण्यात यशस्वी होत आहेत.
शासनाने या स्थानिक पातळीवरील पाणी-आडवा ,पाणी जिरवा या संकल्पनकडे गांभीर्याने पाहिले नाही तर भिषण पाणी टंचाई निर्माण होईल, यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.