नवी मुंबई:
नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर ५ परिसरात मूलभूत नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. कोकण अपार्टमेंट व महादेव शंकर अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या गटारांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, गटारातून सातत्याने घाण पाण्याचा प्रवाह वाहत आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी येथील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.



या गंभीर समस्येकडे नवी मुंबई महानगरपालिका तसेच कोपरखैरणे वॉर्ड कार्यालयातील संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांची ठाम मागणी आहे की, शहरातील गटारे व फुटपाथ तातडीने स्वच्छ करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी. तसेच नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात. अन्यथा नागरिकांमध्ये तीव्र आंदोलन छेडले जाऊ शकते, असा इशाराही देण्यात येत आहे.
प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विष्णू बुरे नवी मुंबई
