पाठीवर मारा, पोटावर नको! मुरबाडमधील गरीब हातगाडीवाल्यांवर पोलिसांची लाथ

मुरबाड प्रतिनिधी | जन मेट्रो

वडापाव विकून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या गरीब हातगाडीवाल्यांवर येथील पोलिसांची कारवाई सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. एसटी स्टॅन्ड समोर हातावर पोट भरणाऱ्या टपरीवाल्यांवर महिन्यात दोनदा दंड आकारला जात असल्याने “पोट भरावे की दंड भरावे?” असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे.

उड्डाणपुलाच्या कामामुळे वर्षभर बंद असलेले हे व्यावसायिक गेल्या महिनाभरापूर्वी पुन्हा आपल्या ठिकाणी परतले होते. मात्र म्हसा यात्रेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांच्या गाड्या २० दिवस हटवण्यात आल्या. आता पुन्हा व्यवसाय सुरू केल्यावर दोन पोलिसांकडून दर महिन्याला दोनदा दंड आकारला जात असल्याची तक्रार हातगाडीवाल्यांनी कर्तव्यदक्ष उपपोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे रस्त्याच्या वाढीव बाधित भागातील लाकडी शेड आणि टपऱ्यांवर कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे अनेक टपरीवाले, फेरीवाले आणि छोट्या दुकानदारांची रोजंदारी संपुष्टात आली आहे. तीन हात नाका ते विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयापर्यंत काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून, तहसील कार्यालय वळणापासून पुढील कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेली बांबू व झोपड्यांच्या स्वरूपातील दुकाने निर्दयपणे हटवण्यात येत आहेत.

“विकास करताना काही पर्याय का नाही? थेट जेसीबी चालवणे म्हणजे प्रशासनाची संवेदनहीनता नव्हे तर गरिबांविरोधात उघड अन्याय,” अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एसी ऑफिसमध्ये बसून विकासाचे आराखडे आखणाऱ्यांना या टपरीवाल्यांच्या रिकाम्या चुली कदाचित दिसत नसाव्यात.

आज प्रशासनाचा बुलडोझर टपऱ्यांवर चालला, तर उद्या कोणाच्या पोटावर चालेल याचा भरोसा नाही. हा विकास आहे की गरिबांना संपवण्याचे धोरण? असा संतप्त सवाल आता मुरबाड शहरातून उपस्थित होत आहे. आधीच बंद पडलेल्या औद्योगिक वसाहतीत या कारवाईने बेरोजगारीत आणखी वाढ होणार असून, कष्टकरी वर्गावर दुहेरी फटका बसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *