वाडा-मनोर मार्गावर अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका, कारवाईअभावी नागरिकांमध्ये संताप

पालघर | प्रतिनिधी – बापू वाघत

वाडा-मनोर रस्त्यावरील पाली परिसरात पुन्हा एकदा मोठा अपघात होता होता टळल्याची घटना घडली असून, या मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर आठवड्यातून एक-दोन वेळा तरी अवजड वाहने अडकल्याच्या किंवा धोकादायक स्थिती निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत.

या मार्गावरून नियमबाह्य पद्धतीने धावणाऱ्या अवजड वाहनांवर ना आरटीओ विभागाकडून कारवाई केली जात आहे, ना पोलीस प्रशासनाकडून त्यांना अडवले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दुसरीकडे मात्र सामान्य व गरीब वाहनचालकांकडून दंडाच्या नावाखाली पैसे वसूल केले जात असल्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, मोठ्या भांडवलदार कंपन्यांची अवजड वाहने शासनाचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यावरून मुक्तपणे वाहतूक करत आहेत. मात्र अशा वाहनांवर कठोर कारवाई होत नसताना सर्वसामान्य जनतेवरच कायद्याचा बडगा उगारला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या प्रकारामुळे कधी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसून, संबंधित प्रशासनाने वेळीच दखल घेऊन अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. “हे प्रकार कुठेतरी थांबतील का आणि यावर कधी अंकुश बसेल का?” असा सवाल करत परिसरातील जनता प्रशासनाकडे आशेने पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.