प्रदूषणाच्या विळख्यात नवी मुंबई; हवेची गुणवत्ता घसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

नवी मुंबई | प्रतिनिधी स्वच्छतेच्या बाबतीत देशात नेहमीच अग्रक्रमावर असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेसमोर आता गंभीर प्रदूषणाचे आव्हान उभे ठाकले आहे. अलीकडे नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून, ती थेट ३०१ इतक्या धोकादायक पातळीवर पोहोचल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना श्वास घेणेही अवघड झाले असून नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी, खोकला, श्वसनाचे विकार तसेच इतर आजारांना सामोरे जावे लागेल, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली वृक्षतोड, औद्योगिक कारखान्यांकडून होणारे वायू व जलप्रदूषण यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

विशेषतः नेरूळ, सीवूड, बेलापूर आणि कोपरखैरणे परिसरात काही नाल्यांमध्ये थेट रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. सेक्टर १ परिसरातील नाले अक्षरशः रसायनांनी भरले असून, अनेक ठिकाणी नाले बुजून अतिक्रमण वाढत असल्याचेही दिसून येत आहे. या गंभीर प्रकारांकडे महानगरपालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत का, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एकीकडे स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळवणारी नवी मुंबई महानगरपालिका, तर दुसरीकडे वाढते प्रदूषण यामुळे शहराची ओळखच धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रदूषणाचा विळखा अधिक घट्ट होण्यापूर्वी महानगरपालिका आयुक्त व संबंधित प्रशासनाने तातडीने हवेच्या गुणवत्तेकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नवी मुंबईकरांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *