वाडा नगरपंचायतीच्या नवनियुक्त सदस्यना अनावृत्त पत्र-

मोहन पाटील
पवित्र वैतरणा नदीतिरी व संयुक्त ठाणे जिल्ह्याची नाभी म्हणावी अशा मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या, बारा बलुतेदार अलुतेदार व व्यापारीबहुल व्यापार पेठ म्हणजे वाडा नगर.

स्वातंत्र्यापासून मागील 75 वर्षात तालुक्यात चार-पाच मोठे पूल, एमआयडीसी, कारखाने येण्याशिवाय भरीव कार्य दृष्टीस पडत नाही. द्रष्ट्या- विजनरी राजकीय नेतृत्वाच्या अभावामुळेच देशाच्या आर्थिक राजधानीच्या वेशीवर असूनही, वाडा नगर आजही नळ गटार रस्ते पाणी ट्रॅफिक स्वच्छता याच पायाभूत सुविधांच्या अपेक्षांत गुरफटले आहे.


तूर्तास वाडे शहराचा विचार करता, वाडेकरांच्या वाडा नगरपंचायतीकडून असलेल्या अपेक्षा:-

पुढील किमान 50 वर्षांचा व वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून मोठी आणि पर्याप्त पाणी योजना व्हावी.
शहरापासून दीड किलोमीटर वरील वैतरणा नदीवरील सिद्धेश्वर बंधाऱ्यातून पाणीपुरवठा वाडे शहरास होतो. एप्रिल मे महिन्यात बंधाऱ्यातील पाणी आटते. अशावेळी शिरसाट डोहातून पाणी लिफ्ट करून खाली सोडावे लागते, जे (तेथील खडकांमुळे) खर्चिक व तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे आहे. या सिद्धेश्वर बंधाऱ्याची उंची रुंदी वाढवून, मजबुतीकरण केल्यास तेथेच पर्याप्त पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल .
त्याशिवाय पिंजाळ नदीवरील कावळा डोह जो वाडा शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर आहे, येथे बंधाऱ्याशिवाय वर्षभर भरपूर पाणीसाठा असतो. येथील पाणी लिफ्ट करून स्वामी शाळेजवळील पाटबंधारे खात्याच्या तीन एकर उंचवट्याच्या जागेवर पाणी योजना उभारल्यास, पुढील 50 वर्षांचे पाणी नियोजन होऊ शकेल.
कोकाकोलाने वैतरणा नदीवर गांधरे येथे बांधलेल्या बंधाऱ्यात कधीही न आटणारा पाणीसाठा असतो. तेथूनही काही प्रमाणात पाणी वाडा शहरासाठी उचलणे शक्य आहे .
(वाडे गावठाण हद्दीत शासकीय रेकॉर्ड अगदी 27 विहिरी जिवंत व अस्तित्वात होत्या. त्यातील पाच-सहा बुजून त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. उर्वरित विहिरी सपशेल दुर्लक्षित आहेत. त्यांची खोली वाढवून दुरुस्ती केल्यास, ते पाणी देखील वापरास उपयोगात येईल.)

परळी नाक्यावरील पुरातन- कधीही न आटणारा व जिवंत असे वैशिष्ट्य असलेला तलाव आजही शासनाच्या रेकॉर्डवर- सातबारा सदरी 27 एकरावर वसलेला दिसतो.

तळ्याभोवती मनोरंजन पार्क, उत्तम गार्डन्स, ज्येष्ठ नागरिक कट्टे, वॉकिंग व सायकलिंग ट्रॅक्स उभारावेत. शक्य तितका तळ्यातील गाळ काढून- खोली वाढवून त्यामध्ये पेडल व स्पीड बोटिंग सुविधा सुरू कराव्यात, उत्तम प्रकारचे फाउंटेन्स उभारावेत.
27 एकरावरील या जिवंत पण परंतु अक्षम्य दुर्लक्षित तळ्याचे यथोचित- नियोजनबद्ध सुशोभीकरण केल्यास, शहर सौंदर्यात भर पडून, वाडेकरांना एक हक्काचे अत्योत्तम करमणूककेंद्र उपलब्ध होईल.

वाडा- नाशिक (देवगाव) हा राज्यमार्ग वाडा शहराच्या अगदी मधून जातो. त्याचे रुंदीकरण होऊनही तो आजघडीच्या वाहतुकीस अपुरा पडतो. तेव्हा कैलास टॉकीज पासून पाटील आळी मार्गे हनुमान मंदिर पर्यंतच्या (अलीकडेच काँक्रिटीकरण झालेल्या) डायव्हर्शन रोडचे रुंदीकरण केल्यास, मुख्य रस्त्यावरील वाहतूकभार मोठ्या प्रमाणात विभागला जाऊन हलका होऊ शकेल .

शहराची रचना दाटीवाटीची आणि अंतर्गत गल्ल्यासदृश्य रस्त्यांचे शक्य तितके आताच रुंदीकरण झाल्यास, नागरिकांची भविष्यातील गैरसोय दूर होईल.

शहरात काही अतिक्रमणे हटवून खेळाची मैदाने व सुंदर संगोपित बगीचे तयार व्हावेत.

संपूर्ण शहरात एकही असा चौक नाही जेथे एखादे प्रेरणाचिन्ह, स्मृतीस्मारक, महापुरुषांचा पुतळा, स्मृतिस्तंभ किंवा सुशोभन चिन्ह उभारता येईल. भविष्यात नगर नियोजन करताना, विस्तारणाऱ्या शहरात सुशोभित चौक निर्माण केले जावेत.

वाडे शहरात पार्किंगची पर्याप्त व्यवस्था नसल्याने ट्रॅफिक जॅमचा प्रश्न नित्याचा व जटील झाल्याने , मुख्य बाजारपेठेत येणारे ग्राहक, ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या वाहने पार्किंगची व्यवस्था प्राधान्याने व योग्य प्रकारे होणे अत्यंत गरजेचे व तातडीचे आहे.

एकमेव गणेश मैदान आज आक्रसले आहे, तेव्हा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्य मोठ्या मैदानांची शहराला नितांत आवश्यकता आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागातून रानमेवा, कृषी उत्पादने, गावरान पालेभाज्या आदी विक्रीस आणणारे किरकोळ विक्रेते पीडब्ल्यूडी, पी जे हायस्कूल पासून बसस्टॅन्ड पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बसतात, जेथे ग्राहक खरेदीसाठी जमा होतात. हे ग्राहक दुचाकी व चार चाकी रस्त्याच्या कडेस उभ्या करीत असल्याने, येथे नित्य ट्रॅफिकजाम होत असतो. किरकोळ विक्रेत्यांच्या बसण्याची अन्यत्र योग्य सोय लावल्यास, व परळी नाका ते खंडेश्वरी नाक्यापर्यंत एकही हातगाडी लावू न दिल्यास, ट्रॅफिक जामचा प्रश्न बऱ्यापैकी दूर होईल . (याच ट्रॅफिक जॅममुळे वाडा बसस्टॅन्ड पुढील परळी नाक्यापर्यंतची बाजारपेठ हळूहळू ओस पडून, ग्राहकांनी खंडेश्वरी नाक्यास पसंती दिल्याने, विशेषतः परप्रांतीयांची नवी बाजारपेठ खंडेश्वरी नाका भागात कधी तयार झाली, ते कळले देखील नाही.)

वाडा शहरात विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी अभ्यासिका, संस्कार केंद्रे, व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारली जावीत.

शहरातील बचत गट व कुटीरोद्योगातून तयार होणाऱ्या वस्तू- उत्पादने – पदार्थ, कृषी उत्पादने यांच्या विक्री प्रोत्साहनार्थ विक्रीकेंद्र/ विक्रीपेठ/ बचत गट भवन उभारावे, जेणेकरून महिलांना आपली गृहनिर्मित उत्पादने विकण्याचे हक्काचे कायमस्वरूपी विक्री केंद्र उपलब्ध होईल.

बहुउद्देशीय कम्युनिटी हॉल उभारावा, जिथे मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच विविध प्रशिक्षण शिबिरे, योग शिबिरे, ध्यान शिबिरे इ. बारमाही भरवता येतील.

वाड्यास लगत पूर्वेस चारशे एकर जागेवर होऊ घातलेल्या कादिवली एमआयडीसीत एकही केमिकल किंवा प्रदूषणकारी कारखाना उभारला जाणार नाही, याची गांभीर्याने दखल नगरपंचायतीने घ्यावी. अन्यथा होणाऱ्या वायू व जलप्रदूषणाचा फटका वाडे शहरास सर्वाधिक बसेल.

खंडेश्वरी नाका येथे तीन बाजूंनी धावणाऱ्या वाहनांमुळे अपघात प्रवण बनलेल्या व सततची ट्रॅफिक होत असलेल्या खंडेश्वरी नाका येथे तातडीने पूल अत्यावश्यक आहे.

वाड्याची ओळख जगभर निर्माण करणाऱ्या वाडा कोलम (घुड्या) असंकरीत, अस्सल सेंद्रिय, मूळ वाणाच्या झिनी कोलम, सुरती कोलम तांदळाच्या विक्रीचे केंद्र नगरपंचायतीने उभारावे व विक्रीस प्रोत्साहन देऊन, आपल्या वाडा कोलमची ओळख जोपासावी.

फटाके विक्रीचेही वाडा हे राज्यात प्रसिद्ध असे केंद्र बनले असून, एम एम आर रीजन ते राज्यभरातून फटाके खरेदीस, किरकोळ व घाऊक खरेदीदार येत असतात. बंदी नसलेले फटाकेविक्री वर्षभर व्हावी, विक्रेत्यांनी सुरक्षेचे सर्व नियम निकष पाळावेत, याकरिता नगरपंचायतीने व्यापाऱ्यांना आचारसंहिता घालून द्यावी व ग्राहकसुलभता आणून, फटाकेव्यापारास प्रोत्साहन द्यावे.

कोने येथे 17 एकर जागेवर बालेवाडीच्या धरतीवर होऊ घातलेल्या परंतु नेतृत्व व शासकीय अनास्थेपोटी दुर्लक्षिलेल्या क्रीडा संकुलाची उभारणी लवकर कशी होईल /त्याकरिता आवश्यक तो निधी कुठून कसा आणता येईल व भविष्यात वाड्यातून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू कसे निर्माण होतील, याकरिता पुढाकार घेऊन पाठपुरावा करावा.

वाडा तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन ही कार्यालये इंग्रजकालीन दगडी बैठ्या तुटपुंज्या वास्तूत सुरू आहेत. तीच गत पंचायत समिती व टी आय एल आर ची. (ही कामे वाडा नगरपंचायतीची नसली तरी,) वाड्याचे प्रथम नागरिक व अन्य जागरूक नागरिकांनी तीन-चार शासकीय कार्यालयांकरिता एक सुनियोजित एकत्रित प्रशासकीय भव्य व आदर्श वास्तू मुबलक पार्किंग सह उभारणे संदर्भात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करावा.

वाडा नगरपंचायतीच्या शेजारील ग्रामपंचायतींची मान्यता असल्यास, वाडा नगरपंचायतिची कक्षा वाढवावी, जेणेकरून मोकळ्या जागा उपलब्ध होऊन, विकास आराखडा व्यापक- नियोजनबद्ध आखून, योग्य ती आरक्षणे ठेवून ग्रामपंचायत क्षेत्रांचाही विकास साध्य होईल.

वाडा शहरात स्थलांतरीतांचे प्रमाण अत्याधिकआहे. दिवसेंदिवस विस्तारणाऱ्या वाडा शहराचा नवा डीपी प्लान (विकास आराखडा) तयार झाला असून, त्यामध्ये शहराभोवतालून जाणारा मोठा रिंग रोड प्रस्तावित असून, हा डीपी प्लान शासन मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. नगर विकास खाते मा. ना. शिंदे साहेबांकडे आहे. या मागणीचा योग्य पाठपुरावा करून मंजुरी आणल्यास, शहराचे सुनियोजन शक्य होईल व रस्त्यांचे जाळे उभारता येईल

गावठाणातील अतिक्रमणे हटविल्यास नगरपंचायतीला काही भूखंड उपलब्ध होऊ शकतील.

वाडे शहरात काँक्रीट रस्ते वर्षभरापूर्वी बांधून झाले, त्यानंतर शहरात वेगवेगळ्या उपनगरात सात ठिकाणी पाणी टाक्यांचे बांधकाम सुरू असून, पाण्याचे पाईप टाकण्यासाठी नागरिक असहकार पुकारत असल्याने, अगदी वर्षभरापूर्वीचे काँक्रीट रस्ते खोदून पाईप टाकणे सुरू आहे. शहराचा शाश्वत विकास अभिप्रेत असल्यास पुढे या गोष्टी टाळणे आवश्यक आहे.

नवनियुक्त कार्यकारी मंडळ प्रशासन व नागरिक व लोकनेते यांच्या समन्वयातून सहभागातून प्रामाणिक प्रयत्न झाल्यास शहराचा शाश्वत, सर्वांगीण व नियोजनबद्ध विकास नक्कीच शक्य होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.